Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी ४

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी ४

मी त्यावेळेस शिकावू उमेदवार होतो. 
आज जसं सहजपणे संगणक आणि इंटरनेट उपलब्ध आहे तसं त्यावेळेस नव्हतं. 
कारखान्यामध्ये काही मोजक्याच लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. 
त्यातीलच एक मेंटेनन्स हेडने माझं काम बघून इंटरनेटचा पासवर्ड दिला होता. 
रिकामा वेळे मध्ये नवीन प्रणाली काय आहेत हे त्यावर शोधायचा प्रयत्न करायचो आणि अर्थातच कधी कधी डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वर त्याच्या नोट्स पण बनवायचो
त्याचा वापर इतरांना ट्रेनिंग देण्यासाठी करायचो.
अगदी आत्ता आत्तापर्यंत त्या डॉट मॅट्रिक्स पेजेसच्या फाईल सांभाळून ठेवल्या होत्या. 
कधीतरी घर आवरताना सौच्या हाती त्या लागल्या आणि नंतर त्या रद्दीत गेल्या 😀. 
तर विषय इंटरनेटचा सुरू होता. तेव्हा नुकतंच दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका ह्या इंटरनेटवर टाकणं शैक्षणिक मंडळाने चालू केलं होतं. 
आमच्याकडच्या काही कामगारांची मुले मुली दहावी बारावीला होती. निकाल लागल्यानंतर त्यांनी मला गळ घातली आणि इंटरनेटवर त्यांचे गुण बघायला सांगितले. 
एक-दोन म्हणता म्हणता चांगला दहा-बारा जणांचा जमा वडा माझ्या भोवती जमला. शॉप फ्लोर वर कुणाचंही लक्ष वेधून घेण्यासारखंच ते दृश्य होतं. 
थोड्यावेळाने एक कडक इस्त्री असलेले कपडे घातलेला माणूस तिथे डोकावला. 
मला फर्ड्या इंग्रजीमध्ये विचारलं काय चाललंय. 
मी देखील वर न पाहतच त्याला सांगितलं सर आपल्या कामगारांची मुलं अतिशय चांगल्या गुणाने पास झालेली आहेत. त्यांचेच गुणपत्रिका बघतोय. 
असं बोलून मी वर बघतो तर माझ्या भोवती जमलेली गर्दी सूबाल्या झालेली. 
प्रश्न विचारणाऱ्या माणसाने मला नाव विचारले आणि तो तिथून निघून गेला. 
मी दुकान बंद करून माझ्या कामाला लागलो. थोड्यावेळाने मेंटेनन्स हेड माझ्याकडे आले आणि मी काय करत आहोत याविषयी त्यांनी मला चांगलेच लेफ्ट राईट केले. मीही आपलं खरं काय ते सगळं सांगून टाकलं वरतून हेही सांगितलं की मेंटेनन्सचा एक ऑपरेटर यांचा मुलगा हा 90% ने पास झालेला आहे. 
पुढचं काही ऐकून न घेता त्यांनी मला वरच्या मजल्यावर असलेल्या प्लांट हेड ऑफिसमध्ये जायला सांगितलं.
त्यांनी अस सांगितल्यावर मी थोडा काळजीतच पडलो पण तिथे गेलो.
दार वाजून रीतसर आत मध्ये ये अशी परवानगी मिळाल्यानंतर मी आत गेलो. मघाशी खाली शॉप फ्लोर वर भेटलेलेच अधिकारी तिथे बसलेले होते. माझं नाव, काय करतो, कधीपासून इथे आहे इत्यादी चौकशी केली. मी मनातल्या मनात आता काय ऐकायला मिळतं असा विचार करत तिथे उभा होतो. 
तसे ते मेज ओलांडून बाहेर आले. खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले हे बघ तू केलं ते चांगलंच केलं परंतु आस्थापनाचा कम्प्युटर असेल अथवा इंटरनेट कुठल्याही खाजगी गोष्टीसाठी मुळीच वापरायचं नाही. नंतर पाठ थोपटून म्हणाले जा आता. 
बाहेर आल्यावर एक मोठा विश्वास टाकला. 

ती गोष्ट मात्र मी कायमच लक्षात ठेवली. आता गेल्या काही वर्षांमध्ये व्हॅल्यू शिकवताना ह्या गोष्टी आठवतात. 20 / 21 वर्षांपूर्वी व्हॅल्यू वर एवढा फोकस नसताना साध्या साध्या गोष्टी शिकवणारे असे चांगले व्यवस्थापक मिळाले हे भाग्यच. 
#नोंद

No comments: