कुठलाही रिपोर्ट किंवा प्रेझेंटेशन बनवताना लाल रंग वापरायचा नाही ही शिकवणी मिळण्याचा किस्सा मोठा मजेशीर आहे.
या गोष्टीला साधारण 18 वर्षे झाली असावी. आमच्याकडे एक थ्री पी रिपोर्ट सुरु करण्यात आला होता. त्याचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे होतं. त्या रिपोर्ट मध्ये वेगवेगळ्या विभागामधील वेगवेगळे पॅरामीटर्स काय आहेत हे टाकल्या जायचं.
तर एक विशिष्ट विभाग त्या रिपोर्ट साठीचा लागणारा अद्यावत डेटा कधीच वेळेत द्यायचा नाही.
असं दोनदा तीनदा झाल्यावर मी यांच्याकडून अमुक अमुक डेटा मिळाला नाही असं मोठ्या लाल अक्षरात लिहून तो रिपोर्ट आमच्या वरिष्ठांना पाठवला.
थोड्या वेळानंतर मला आमच्या व्हाईस प्रेसिडेंट साहेबांच्या ऑफिसमधून बोलावण्यात आले.
तिथे गेल्यानंतर त्यांच्या एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट यांनी मला बसायला सांगितले. माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करून ते त्यांचं काम गालातल्या गालात हसत करत राहिले.
अतिशय शिस्तीचे असणारे आमचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी आपल्याला का बोलावले असावे याचा विचार करत मी खुर्चीमध्ये चुळबुळ करत बसलो. एकदा दोनदा त्यांना विचारल्यावर त्यांनी तेच हास्य कायम ठेवत काहीही सांगण्यास नकार दिला.
थोड्या वेळानंतर मला आत जा असं सांगण्यात आलं.
रीतसर परवानगी घेऊन मी आत गेलो आणि उभा राहिलो. माझ्या आल्याची नोंद घेत माझ्याकडे न बघता त्यांनी हातानेच खुर्चीवर बसायचा इशारा केला.
व्ही पी सरांनी त्यांचा लॅपटॉप ला जोडलेला मॉनिटर माझ्याकडे वळून मला म्हटले मिस्टर काळे तुम्ही हा रिपोर्ट मला पाठवलेला आहे. मी तोंडातल्या तोंडात हो सर असं काहीतरी म्हणून पुढे काय होतंय याचा विचार करत बसलो.
त्यांनी मीच पाठवलेले प्रेझेंटेशन मला दाखवायला सुरुवात केली. एकेक स्लाईड बदलत ज्या ठिकाणी मी लाल अक्षरात लिहिलं होतं डेटा नॉट रिसिव्ह तिथपर्यंत ते आले.
आता डोळ्यावरचा चष्मा काढून खुर्ची फिरवून माझ्याकडे तोंड करून हातात धरलेला तो चष्मा एखाद्या बंदुकी सारखा माझ्याकडे त्यांनी रोखला.
मिस्टर सचिन पुन्हा जर असं काही लिहून तुम्ही मला पाठवलं तर तो तुमचा या संस्थेतला शेवटचा दिवस असेल. समजलं जा आता.
जा आता ऐकल्याबरोबर पटकन उठून त्यांच्याकडे नजर न टाकता तोंडातून तोंडात सॉरी सर असं काहीतरी पुटपुटत मी बाहेर आलो.
बाहेर आल्यावर आमच्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंट च्या जागेवर आलो आणि धपकन त्याच्या समोरच्या खुर्चीमध्ये बसलो. त्यांनी पण माझीच वाट पाहत असल्यासारखी पाण्याची बाटली माझ्यासमोर ठेवली. घटाघटा पाणी पिताना लक्षात आलं की पाठ घामाने चिंब झालेली आहे.
तेच ते गावातलं हसू खेळवत असिस्टंट सरांनी मला विचारलं काय झालं बरं.
थोडक्यात तो सगळा किस्सा मी सांगितला. चांगलाच घाबरलेलो. त्यांचं गालातला हसू या कानापासून त्या कानापर्यंत पसरलेलं. मला मात्र नोकरी गेल्यावर काय होणार नुकतंच आपलं लग्न ठरलेलं असं सगळं आठवत प्रचंड ताण आलेला. सर आता पुढे काय मी धीर करून विचारलं.
त्यांच्या त्याच मराठवाडी टोन मध्ये ते मला म्हणाले अरे जा कामाला लाग आता.
मी खांदे पाडून उठल्यावर बाहेर पडायच्या आधी त्यांनी मला परत आत बोलावलं.
तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो या कंपनीमध्ये त्यांनी आतापर्यंत चार लोकांना सांगितले आहे की मी तुला घरी पाठवून देईल. त्यातला एक जण तुझ्यासमोर आहे, मागच्या पंधरा वर्षापासून इथेच आहे. दुसरा तुझा साहेब आहे तेही वीस वर्षापासून इथेच आहे. जा आता चांगलं काम करतो तू.
तिथून पुढे कधीही लाल रंग प्रेसेंटेशन मध्ये वापरला नाही.
अजूनही कधी एखाद्या वेळेस माझा एखादा सहकारी लाल रंग लावून रिपोर्ट पाठवतो त्यावेळेस त्याला मी जवळ बोलून सांगतो अरे लाल रंग वापरायचा नाही. ते सांगताना मला आमचे व्हि पी सर आठवतात. छान खळी पाडून हसणारे असिस्टंट सरही आठवतात.
आता व्ही पी सर निवृत्त झालेले आहेत त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment