Wednesday, 15 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी १८ ओव्हरटाईम

महिन्याच्या सुरुवातीला मागील महिन्याचा प्रॉफिट आणि लॉस रिपोर्ट आला. वाढलेली कन्वर्जन कॉस्ट बघून प्लांट हेडच्यां कपाळावरच्या आठ्या आणखीनच गडद झाल्या. मागील काही महिन्यांपासून ऑर्डर तर वाढलेली नाहीये  तरी पण कन्वर्जन कॉस्ट का वाढत चालली. या प्रश्नाभोवती त्यांचे विचार चक्र फिरू लागलं तसं कम्प्युटरच्या टेबलवर डाव्या हाताच्या बोटाने धरलेला ताल पण वाढू लागला. 
कुठलंही उत्पादन बनवताना जो खर्च येतो त्याचे प्रामुख्याने तीन भाग केले जातात एक असतं मटेरियल कॉस्ट म्हणजे  उत्पादन बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल. त्यानंतर येते कन्व्हर्शन कॉस्ट त्यामध्ये मशीन चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा, मशीनचे देखरेखी साठी लागणारे वेगवेगळे स्पेअर्स त्याला रिपेयर आणि मेंटनन्स कॉस्ट असं पण म्हणतात. त्यानंतर मनुष्यबळासाठी लागणारी कॉस्ट इत्यादी वेगवेगळ्या घटक येतात. सरते शेवटी हा सर्व उपद्रव्याप करण्यासाठी लागणारा खर्च ज्यामध्ये कॉमन सर्विसेस आणि एडमिन कॉस्ट येते. 
यामध्ये मटेरियल कॉस्ट आणि कन्वर्जन कॉस्ट ही उत्पादनाच्या संख्येनुसार कमी जास्त होणे अपेक्षित असते. 
एडमिन कॉस्ट मात्र बऱ्यापैकी स्थिर असते अथवा त्यामध्ये फार थोडा बदल उत्पादनाच्या संख्येनुसार होतो. 
आपल्या या कंपनीमध्ये वाढलेली कन्वर्जन कॉस्ट हा एक मोठाच कळीचा मुद्दा होता. 
त्याचा अध्ययन केल्यानंतर असं लक्षात आलं की कन्वर्जन कॉस्ट मध्ये मनुष्यबळ साठीची कॉस्ट ही प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. 
प्लांट हेड नी ऑपरेशन हेडला बोलाविले आणि याचे एनालिसिस करण्यास सांगितले. 
अधिक खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की मागील काही महिन्यांपासून ओव्हरटाईम अर्थात ओटी साठीचा खर्च हा वाढलेला आहे त्यामुळे मनुष्यबळ कॉस्ट ही पण वाढलेली आहे. 
एकदम सरळ उपाय होता की ओटी पूर्णपणे बंद करायचा. पण तसं करण्यामध्ये ऑपरेशन टीमला धोका जाणवत होता. 
त्यावर प्लांट हेडने बिझनेस एक्सलन्स टीमला टाईम स्टडी आणि मोशन स्टडी करायला सांगितला. टाईम स्टडी आणि मोशन स्टडी हे दोन्ही टूल्स इंडस्ट्रियल इंजीनियरिंग मध्ये येतात आणि कुठलही काम करण्यासाठी किती वेळ लागेल हे मोजण्याचे ते एक शास्त्रीय परिमाण आहे. 
टाईम स्टडी ही मेथड फ्रेडरिक टेलर तर मोशन स्टडी ही मेथड फ्रॅंक आणि लिलीयन गीलबर्थ या जोडप्याने शोधून काढली. ह्या दोन्ही  कसोट्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या मानक बिंदू आहेत. मागच्या एक शतकाहून अधिक काळ त्या यशस्वीपणे आस्थापनांमध्ये वापरल्या जात आहेत.
त्यानुसार टाईम स्टडी आणि मोशन स्टडी हा करण्यात आला आणि साधारण महिनाभरानंतर त्याचा अहवाल प्लांट हेड यांना सादर करण्यात आला.
त्यामध्ये असं आढळून आलं की दिलेले आठ तास हे विशिष्ट काम करण्यासाठी पुरेसे असून देखील त्या ठिकाणी आठ तासाचे काम आठ तासात न होता  ओव्हरटाईम करण्यात येत होता. 
हा शास्त्रीय रिपोर्ट आल्यानंतर त्यानंतरच्या महिन्यामध्ये  सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले की आता ओटी बंद करण्यात आलेला आहे. 
कुठलाही नवीन बदल झाला की सुरुवातीला कुरबुरी होतातच. पण तिथली कामगार संघटना ही देखील कंपनीच्या भल्याचाच विचार करणारी होती. त्यांनी देखील आस्थापनाने दिलेला शास्त्रीय रिपोर्टचा अभ्यास केला आणि आस्थापनाने सांगितलेल्या गोष्टी मान्य केल्या. 
त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आणि नंतरच्या महिन्यामध्ये कन्वर्जन कॉस्ट ही खाली आली. 
त्यामुळे ती कंपनी नफ्यात आली हे वेगळे सांगायला नकोच. 
सचिन काळे ©️ 

No comments: