Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्ट ८

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्ट ८ 

तर त्याचा असं झालं की सेव्हन हॅबिट्स वरील प्रशिक्षण कार्यशाळा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी घेतली. पूर्ण आठ तास वरिष्ठ आणि मध्यम व्यवस्थापनाचे लोक सहभागी असलेले ते सेशन खूप छान प्रकारे रंगले. 
खरंतर त्यादिवशी ट्रेनिंग घेणारे हे सर यांना चार महिन्यापूर्वी पर्यंत वेळच नसायचा. 
मनुष्यबळ विकास विभागातील सर्वोच्च पदावर असल्यामुळे त्यांच्याकडे मिनिटा मिनिटाचे कॅलेंडर हे बुक असायचे.
त्यांची भेट घेण्यासाठी बिजनेस हेड असो अथवा प्लांट हेड त्यांना देखील अपॉइंटमेंट बुक करावी लागायची. 
चार महिन्यांपूर्वी काही कारणांमुळे त्यांच्याकडचा बराचसा पदभार हा कमी करण्यात आला होता. 
पद जरी तेच असले तरी रोजच्या कामामधून त्यांना बाजूला जरी नाही तरी खूप किचकट आणि महत्त्वाची कामे या मधला त्यांचा सहभाग हा जाणवण्याइतपत कमी झाला होता. 
स्वतःला नेहमी व्यस्त ठेवणारे हे सर आता या वेळेचं काय करतील असा प्रश्न हा कॅरिडॉर टॉक मध्ये कुजबुजला जात होता. 
त्याचे उत्तर चार महिन्यानंतर ती कार्यशाळा संपताना तिथे जमलेल्या सर्वांनाच मिळालं होतं.
मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून मूळचच शिकवण्याचं आवड असलेलं अंग त्यांनी अधिक विकसित केलं होतं. 
त्यासोबतच स्वतःवर त्यांनी भरपूर वेळ देऊन नवीन ज्ञान आणि कौशल्य मिळवले होते. 
मानवी संबंध, इमोशनल इंटेलिजन्स, हॅबिट्स, नवनवीन तंत्रे आत्मसात करून त्यांनी त्यांचा वेळ तर सदुपयोगी लावलाच त्यासोबतच ट्रेनिंग घेऊन आपल्या सहकाऱ्यांचेही ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्याचे कार्य केलं होतं. 
दरम्यान ते त्या महत्त्वाच्या आणि किचकट कामांमध्ये नसताना त्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागली. 
त्यामुळे काही कालावधीनंतर त्यांना पूर्वीचाच कार्यभार सोपवण्यात आला.

वेळ मिळाला की कार्यरतच राहायचं आणि ज्ञान आणि कौशल्य याला धार लावायची हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो.

त्यासोबतच कितीही आणि कशीही परिस्थिती कार्यस्थळी असली तरी स्वतः चे मनोधैर्य खचू न देता त्यामध्ये काय साध्य करता येईल याचा विचार करायचा हे देखील त्यांनी स्वतः करून दाखविले.
 
सर आता निवृत्त झालेत, तसं असूनही ते अजूनही कार्यरत आहेत आणि अनेक कंपन्यांना आय आर या विषयावर तसेच मानवी संबंध विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन करतात.

सचिन काळे ©️

No comments: