Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी ९

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी ९

पारदर्शकता ठेवा आणि पहिल्यांदाच खरं बोला. 

त्यावेळेस एक किचकट पार्ट विकसित करणे चालू होते.
त्यासाठी ग्राहकाकडून मिळालेले ड्रॉईंग, त्यानुसार तो आपल्याला बनवता येईल की नाही याचा अभ्यास. 
त्याला फिजिबिलिटी स्टडी असं म्हणण्यात येते. 
तर या पार्टचा फिजिबिलिटी स्टडी करण्यात आला आणि असं लक्षात आलं की तो बनवला जाऊ शकतो. त्यानुसार चाचणी घेण्यासाठी काही टूल्स बनवण्यात आले आणि प्रोसेस विकसित करण्यात आली. 
एक चाचणीसाठीचा लॉट बनवण्यात आला आणि तो ग्राहकाला पाठवण्यात आला. त्यांच्याकडून त्याचा सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर पुढे ज्याला मास प्रोडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावर एक लॉट बनवणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

हे होत असताना एक अनुभवी तंत्रज्ञ कामगार प्रोजेक्ट मॅनेजर कडे आला त्याच्याकडे ते ड्रॉईंग आणि बनवलेला पार्ट ह्या दोन्ही गोष्टी होत्या. 
प्रोजेक्ट मॅनेजर कडे आल्यानंतर त्यांनी ड्रॉइंग वर दाखवण्यात आलेले एक विशिष्ट डायमेन्शन यावर बोट ठेवून सांगितले की हे ड्रॉइंग वर जरी दर्शवण्यात आलेला आहे तरी हा भाग बनवताना ते साध्य करणे तितकेसे शक्य नाही. यामागे स्वीकारण्यात आलेल्या प्रक्रियेचाही काही भाग होता. 
ते बघितल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर यांनी गुणवत्ता विभाग प्रमुख तसेच उत्पादन विभाग प्रमुख या दोघांनाही तातडीने बोलून घेतले. हे एक डायमेन्शन साध्य न झाल्याने काय होऊ शकते याविषयी त्यांनी चर्चा केली आणि आपल्यापुढे आता काय मार्ग आहेत याविषयी देखील चाचणी केली. 
दरम्यान मास प्रोडक्शन साठी घेण्यात आलेली बॅच थांबवण्यात आली. 
त्या बैठकीच्या शेवटी प्रोजेक्ट मॅनेजर ने ठरवले की आपण हे ग्राहकाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्याला देखील याविषयी काय करता येईल हे विचारू.

त्यानुसार ग्राहकास आलेली अडचण सांगण्यात आली तसेच त्यांना विचारण्यात आले की हे विशिष्ट डायमेन्शन हे गुणवत्तेसाठी किंवा त्यांच्याकडच्या प्रोसेस साठी कितपत महत्त्वाचे आहे. आणि जी प्रक्रिया आपण स्वीकारली आहे त्यामध्ये ते जर साध्य झाले नाही तर काय उपाय आहे.
त्यावर ग्राहकाने थोडा वेळ मागून घेतलां.
काही वेळानंतर ग्राहका कडून त्याविषयीचे उत्तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि टीमला आले. 
त्यात ग्राहकाने ही विशिष्ट गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबद्दल या टीमचे आभार मानले होते. तसेच ते विशिष्ट डायमेन्शन काय असायला हवे याविषयी देखील सुधारित ड्रॉईंग लवकरच पाठवतो असे सांगण्यात आले होते. 
पुढे मग त्या सुधारित ड्रॉईंग नुसार टूल्स मध्ये बदल करण्यात येऊन ते उत्पादन नियमितपणे सुरू झाले. 

 ज्या कामगाराने ही सुधारणा शोधून प्रोजेक्ट मॅनेजर आणि ग्राहक यांना निदर्शनास आणून दिली होती त्याचा मासिक बैठकीमध्ये सत्कार करण्यात आला. 

तांत्रिक बाबतीमध्ये झालेल्या चुका लपत नाहीत. त्यामुळे पारदर्शकपणे खरं ते बोललेलं असेल तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. 

ती एक म्हण आहे ना योग्य वेळेस घातलेला एक टाचा हा पुढची शिलाई उसवणे थांबवतो. 

उत्तम सुधारणा सूचना शिक्षण अथवा पद पाहून येत नाहीत. तर बहुतांश वेळा तिथे काम करणाऱ्या सजग कामगारांकडून त्या येतात.
 
सचिन काळे ©️

No comments: