Saturday, 11 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी ११

मॅन्युफॅक्चरिंग च्या गोष्टी ११

योग्य सल्ला.

त्यावेळेस मी नोकरीच्या शोधात होतो. नुकतीच अभियांत्रिकी ची पदवी प्राप्त झाली होती. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्यानंतरही नवीन नवीन ठिकाणी आवेदन करणे आणि मुलाखतींना उपस्थित राहणे हे सुरू होते.
त्यानुसार एके दिवशी एका पाईप बनवणाऱ्या कंपनीमध्ये माझा मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून मुलाखत ठरली. ठरलेल्या वेळेआधी पंधरा मिनिटे मी तिथे पोहोचलो मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा अधिकाऱ्याला येण्याचे प्रयोजन सांगितल्यानंतर त्याने मला तिथे स्वागतिकेमध्ये बसायला सांगितले.
साधारणतः दुपारी साडेचार वाजता मी तिथे पोहोचलो. त्यानंतर थेट साडेसात पर्यंत माझी कुणीही दखल घेतली नाही. या मिळालेल्या वेळामध्ये कंपनीचे संस्थापक, कंपनीची प्रगती तसेच विजन आणि मिशन हे वाचून झालेले. यादरम्यान साडेपाच वाजता चा भोंगा होऊन गेला. जनरल शिफ्ट संपलेले कामगार अधिकारी माझ्यासमोरून घरी निघून गेले. 
त्यांच्यापैकीच एकाने मला विचारले की मी इथे का आणि कशासाठी आलेलो आहे. त्याला येण्याचे कारण सांगितल्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या दूरध्वनीवरून आत मध्ये कुठेतरी दोन-तीन वेळेस फोन केले. त्यानंतर मला मी कुठे जावयाचे आहे आणि कुणाला भेटायचे आहे हे सांगितले. तसेच जाण्याचा मार्गही हाताने दाखवला. 
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तिकडे जाण्यासाठी निघालो. त्या भल्या मोठ्या इमारतीमध्ये बऱ्याच ठिकाणी पिवळे लाईट्स लागलेले होते. खाली जमिनीवर इतरस्त पाईपचे भेंडोळे तसेच लांब ठेवलेले वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या व्यासाचे पाईप पडलेले होते. त्या पिवळ्या भगभगीत प्रकाशामध्ये ते काळेशार पाईप भक्ष गिळलेल्या अजगरासारखे पहुडले होते. मागच्या तीन तासापासून वाट बघून शिणलेल्या मनाला उभारी येईल असे ते दृश्य मुळीच नव्हते. 
शेवटी कसंतरी रस्ता बघत बघत मी इमारतीच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या एका खोलीच्या बाहेर येऊन पोहोचलो. 
तिथल्या दरवाजाचे हँडल तुटलेले होते तर खालच्या बाजूला लाथा मारल्या सारखा तो दरवाजा झीजलेला होता. दरवाजावर असलेल्या पांढऱ्या पडलेल्या काचेमधून आत मधलं काही दिसत नव्हतं. 
मी तरी टकटक वाजवलं, आतून कोणीतरी या असं म्हणाले. 
आत प्रवेश केल्यानंतर पहिलं लक्ष गेलं ते वेगवेगळ्या रॅकसकडे आणि त्यावर ठेवलेल्या विविध मोटारी टूल स्पेअर पार्ट्स यांच्याकडे. तिथे बाहेरच्या पेक्षा थोडासा प्रकाश जास्त होता त्यामुळेच एका जुनाट टेबलाच्या मागे खुर्चीवर बसलेली व्यक्ती मला दिसली.
मला आत यायला यांनीच सांगितले असावे. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. उसने आणलेली उभारी एव्हाना संपली होती. त्यांनी दिशा निर्देश केला त्या दिशेला एक स्टूल ठेवलेला होता तो त्यांनी पुढे घेऊन बसायला सांगितले. 
आता त्या टेबलाच्या एका बाजूला ते आणि दुसऱ्या बाजूला स्टुलवर मी अशा पद्धतीने आमोरी सामोरे आम्ही दोघे बसलो. मी थोडक्यात त्यांना माझी ओळख करून दिली माझे शिक्षण काय झालेले आहे त्याबद्दलही सांगितले आणि सांगितले की या ठिकाणी एका मेंटेनन्स इंजिनियर ची जागा खाली आहे त्यासाठी मी इथे आलेलो आहे. 
त्यावर त्यांनी मान डोलावली आणि काही बेसिक प्रश्न विचारले ज्यावर मी त्यांना समाधानकारक उत्तर दिले. त्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिनचे वर्किंग कसे होते हाही एक प्रश्न होता. ह्या इंटरनल कंबशन इंजिनच्या वर्किंग ने मला आणि माझ्या बॅच मधल्या सर्वांनाच बऱ्यापैकी पीडलेले होते. त्यामुळेच आम्ही तो धडा चांगलाच गिरवलेला होता. त्यामुळेच आयसी इंजिन चे वर्किंग मी व्यवस्थित सांगू शकलो. 
हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही येथे का काम करू इच्छिता. त्यावर मी त्यांना सांगितले की मला नोकरीची गरज आहे. त्यावर त्यांनी मला सांगितले हे पहा सध्या नवीन तंत्रज्ञान नवीन प्रोसेस आणि नवनवीन प्रयोग हे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये होत आहे. तुम्हाला हवी असेल तर मी ही नोकरी तुम्हाला देऊ शकतो परंतु तुम्ही येथे पुढचे 40 वर्ष जरी काम केले तरी तुम्ही काहीही नवीन शिकणार नाही. त्याऐवजी जरी नोकरीची गरज असली तरी कुठलीही नोकरी पकडण्यापेक्षा तुम्ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये प्रयत्न करा. ऑटोमोबाईल कंपनीमध्ये किंवा त्यांच्या सप्लायर कंपनीमध्ये जरी तुम्हाला नोकरी मिळाली तरी पुढचे तीन-चार वर्ष तुम्हाला एवढे शिकायला मिळेल की ज्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणखीन प्रगती कराल. 

एवढं बोलल्यानंतर त्यांनी दोन्ही हाताचा त्रिकोण केला आणि नजर वर छताकडे लावली. पुढे ते म्हणाले
हे पहा मी मागच्या पंधरा वर्षापासून याच खुर्चीवर बसून तेच काम करत आहे आज मी जरी ठरवले की मी नवीन क्षेत्रामध्ये जाऊन नोकरी करेल तरी ते तितकेसे मला शक्य नाही. त्यामुळे तुम्ही मी काय सांगतो त्याचा विचार करा. 
एवढं झाल्यानंतर ती मुलाखत तिथेच संपली. बाहेर जाण्यापूर्वी मी त्यांच्याशी हात मिळवला आणि त्यांना धन्यवाद दिले. 
आजही मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःच्या अनुभवानुसार योग्य मार्गदर्शन करणारे ते अनामिक मेंटेनन्स हेड मला आठवतात आणि त्यांच्याविषयी मनामध्ये कृतज्ञताच दाटून येते. 

सचिन काळे ©️

No comments: