त्या दिवशीची पहिली शिफ्ट देखील नेहमीप्रमाणे सुरू झाली. नुकताच आलेला सुरक्षा अधिकारी (safety officer) जागेवर बॅग ठेवून कॅन्टीनला जायच का याचा विचार करत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. बघितलं तर सिक्युरिटीने फोन केला होता. कानाला लावून त्याने बोलणे केले.
कॅन्टीनला जायचं आणि नाश्ता करायचा विचार रहित करून सुरक्षा अधिकारी ओ एच सी विभागात धावला.
तिथे जाऊन बघतो तर सात आठ कामगारांचा घोळका एकाला मध्ये ठेवून उभा होता. रात्रपाळीचा ओ एच सी चा कर्मचारी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता.
इथं ओ एच सी विषयी थोडसं.
Occupational health center अर्थात कंपनीमध्ये असलेली प्रथम उपचाराची जागा. या ठिकाणी बहुतांश वेळा दिवसा एखादा शिकवू डॉक्टर अथवा कंपनी जर खूप मोठी असेल तर निवृत्त झालेला डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध असतो. एक अथवा दोन बेड कधीकधी ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर प्रथम उपचार करण्यासाठी लागणारी सामग्री तसेच अँब्युलन्स देखील येथे उपलब्ध असते. रात्रपाळीच्या वेळेस कंपनीमधीलच काही जण ज्यांना फर्स्ट एड कशी द्यावी याचे ट्रेनिंग मिळालेले असते असे कर्मचारी कामगार हे काम बघतात. कुठल्याही कंपनीमध्ये कच्च्या मालाचे रूपांतरण पक्क्यामालामध्ये करताना वेगवेगळ्या प्रोसेस, मशीन त्यासोबतच वेगवेगळे ज्वालाग्रही पदार्थ जसे की एलपीजी अथवा पीएनजी किंवा इलेक्ट्रिसिटी चा वापर करून चालवले जाणारे ओवेन असे वेगवेगळे उपकरणे असतात. त्या व्यतिरिक्त बरेचसे काम हे माणसांकडून केले जाते त्यामध्ये ठोकपिट करणे आले अथवा काही गोष्टी उघडणे बंद करणे असेंबली करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करताना छोटे-मोठ्या इजा होऊ शकतात. अर्थात त्यासाठी कुठलेही कार्य करण्यासाठीची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरवलेली असते. त्यासोबतच वेगवेगळ्या विभाग आणि प्रोसेस यांचे सुरक्षेचे च्या दृष्टीने अति धोकादायक धोकादायक आणि सामान्य असे वर्गीकरण केलेले असते आणि त्यानुसार तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण दिलेले असते. या प्रशिक्षणामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई याचा वापर करणे. कुठल्याही प्रकारची तातडीची अथवा गंभीर परिस्थिती उद्भवल्यास काय कार्यवाही केली पाहिजे याचेही ट्रेनिंग यामध्ये अंतर्भूत असते. सुरक्षा अधिकारी हे नियमित अंतराने रंगीत तालीम द्वारे बघतात की कंपनीचा एखाद्या अपघातजन्य अथवा आपातकालीन परिस्थिती दरम्यानचा प्रतिसाद देण्याचा वेळ काय आहे. आणि या रंगीत तालमीमध्ये सर्व जण कशा पद्धतीने काम करतात हे देखील बघितले जाते आणि मग त्या मध्ये आढळलेल्या त्रुटींवर कार्यवाही देखील केली जाते.
तर परत एकदा आपण या ओएचसीच्या गोंधळाकडे येऊया. तिथे गेल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्याने तिथे येऊन थांबलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्यांना सर्वांना बाजूला व्हायला सांगितले त्याच दरम्यान फर्स्ट एड करणारे दोघेजण तिथे उपस्थित झाले. ज्या व्यक्तीला लागले होते त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आले की त्याचा हात मोडला आहे.
त्याचे निरीक्षण करून त्याला दोन लाकडी पट्ट्याच्या आधाराने तात्पुरते बँडेज करण्यात आले आणि तो हात त्याच्या गळ्यात बांधण्यात आला. तसेच वेदनाशामक गोळ्या देऊन त्याला कंपनीच्या ॲम्बुलन्स मध्ये बसून जवळच्या इस्पितळामध्ये पाठवण्यात आले.
इकडे सुरक्षा अधिकाऱ्याने त्याचा प्राथमिक रिपोर्ट तयार केला तसेच ज्या ठिकाणी म्हणजे शॉप फ्लोअर वर ही घटना घडली तिथेही त्याने भेट देऊन पाहणी केली आणि तिथे काम करणाऱ्या लोकां च्या मुलाखती घेतल्या.
ही घटना रात्रपाळी संपताना आणि दिवस पाळी सुरू होताना घडलेली असल्यामुळे फार काही सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
त्यानंतर सुरक्षा अधिकारी एडमिन विभागाच्या अधिकाऱ्याला घेऊन दवाखान्यात गेला आणि त्या व्यक्तीची मुलाखत घेतली तसेच डॉक्टरांना भेटून त्याच्या प्रकृतीचा अहवाल विचारला. दरम्यान एक्स-रे आणि इतर तपासणी द्वारे हाताचे हाड मोडले असून त्याची एक छोटी सर्जरी करावी लागेल अशा निदानास डॉक्टर आले होते. त्यावर जी कार्यवाही करावी लागेल ती करा असे सांगून ही जोडगोळी परत एकदा त्या व्यक्तीला भेटली.
हे का झाले याविषयी त्या व्यक्तीने असे सांगितले की सकाळी मी तिथे चाललो असताना माझा पाय घसरला आणि मी पडलो आणि त्या दरम्यान हात टेकवतांना माझा हात मोडला. त्याचे हे उत्तर ऐकून घेतल्यानंतर सुरक्षा अधिकारी विचारात पडला कारण सकाळी जेव्हा त्याने त्या शॉप फ्लोअर वरील जागेला भेट दिली होती तेव्हा लक्षात आले की तिथे कुठल्याही प्रकारचे पाय घसरून पडण्यासारखे कारण नाही. तिथे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा कुलंट अथवा ऑइल गळती आढळली नाही.
परत एकदा त्या व्यक्तीला हे का झाले असे विचारले असता त्यांनी आधीचेच पालुपद सुरू ठेवले.
त्याने सांगितलेल्या गोष्टींची आपल्या अपघात कारण मीमांसा रिपोर्टमध्ये नोंदणी करून सुरक्षा अधिकारी आणि एडमिन अधिकारी यांनी त्याला तुझ्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि त्याचा खर्च कंपनी करेल तसेच तू आता सुट्टीवर असताना तुझा पगार देखील चालू राहील असे सांगून आश्वस्त केले.
त्याचा निरोप घेऊन परत येताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात आलेले विचार एडमिन अधिकाऱ्याला सांगितले की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घसरण्याची अथवा पडण्याची परिस्थिती नाही तिथे हा घसरून पडतो कसा आणि याचा हात मोडतो कसा याचा काही थांग लागत नाही.
त्यावर ॲडमिन अधिकारी म्हणाला एवढेच ना चला तुम्हाला मी काहीतरी दाखवतो कारण आपण पूर्ण शॉप फ्लोअरला सीसीटीव्ही द्वारे निगराणीत आणलेले आहे. तो नेमका व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळेल की तिथे खरंच काय झालेले आहे.
पुढे साधारण दोन महिन्यानंतर ती हात मोडलेली आणि आता दुरुस्त झालेली व्यक्ती परत कामावर रुजू झाली. त्याच्या कामाच्या पहिल्याच दिवशी त्याला एडमिन विभागात बोलवण्यात आले आणि त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि घरी पाठवण्यात आले.
कारणे दाखवा नोटीस ही खोटे बोलणे आणि शॉप फ्लोअरवर अयोग्य पद्धतीने वागणे यासाठी बजावण्यात आली होती.
हे असे घडण्यामागे कारण होते त्या दिवशी रेकॉर्ड झालेला तो व्हिडिओ. सुरक्षा अधिकारी आणि एडमिन अधिकारी यांनी सिक्युरिटी विभागामध्ये असलेल्या मॉनिटरवर तो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आढळून आले की अपघात झालेली व्यक्ती ही त्या दिवशी शॉप फ्लॉवर वर एक रिंग घेऊन पळत होती जसे लहान मुले टायर पळवतात तसे आणि पळता पळता तोल जाऊन पडली आणि नेमकी हातावरच पडली आणि त्याचा हात मोडला.
पुढे त्या व्यक्तीने माफीनामा लिहून दिला. तसेच यापुढे अशाप्रकारे अयोग्य वर्तणूक करणार नाही असे लिखित आश्वासन दिले. त्याची त्याआधीची वागणूक आणि काम बघून एडमिन विभागाने उत्पादन विभागाशी चर्चा केली आणि त्याला ताकीद देऊन परत एकदा कामावर रुजू करून घेतले.
शॉप फ्लोअर असो अथवा ऑफिस या ठिकाणी सावधगिरी बाळगून जी काही एसओपी अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवलेली आहे ती पाळणे हे प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांचे कर्तव्य आहे.
कामाच्या ठिकाणी खेळाचे मैदान समजून जर कोणी खेळत असेल, मजा करत असेल तर त्याला सजा मिळायला वेळ लागत नाही.
सचिन काळे ©️