त्यादिवशी कंपनीच्या कॅन्टीन मधलं वातावरण जरा वेगळंच होतं. वातावरणातला ताण हा सर्वांनाच जाणवत होता. कॅन्टीनच्या मधोमध असलेल्या टेबलवर प्रत्यक्ष प्लांट हेड आणि एचआर हेड यांच्या सोबतच्या पंक्तीला कामगार संघटनेचे पदाधिकारी बसले होते. तो एक टेबल सोडला तर सर्वत्र चमचा जरी पडला तरी मोठ्ठा आवाज येईल एव्हडी शांतता होती.
या ताणाची सुरुवात साधारण एक महिन्यापूर्वी झाली होती. विषय होता जेवणानंतर ताट स्वतः उचलून एका नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवणे हा होता. अर्थात परंपरेप्रमाणे तिथे ताट उचलण्यासाठी वेगळ्या व्यक्ती या कॅन्टीनमध्ये कार्यरत होत्या.
आय आर विभाग आणि संघटना यांच्यात संवाद बैठका घेतल्या जाऊनही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शेवटी प्लांट हेड सरांनी जाहीर केले होते की या दिवसापासून मी स्वतः माझे ताट उचलून ठेवेल आणि माझे सहकारी देखील हेच करतील.
तो दिवस आज उगवला होता.
त्या विशिष्ट टेबल कडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. शेवटी त्या टेबलावरील सर्वांचे जेवण संपले. प्लांट हेड यांनी चमचा उलटा करून ताटात ठेवला आणि खुर्ची मागे सरकवून ते ताठ उभे राहिले. ते उभे राहिलेले पाहून त्या टेबलवरील सर्वच जण आपापल्या जागी उभे झाले. प्लांट हेड यांनी आपले ठेवणीतील हास्य चेहऱ्यावर आणत सर्वांच्या कडे एक नजर फिरवली. आणि आपले ताट उचलून ते ठेवण्याच्या जागेकडे चालू लागले. ते पाहून त्यांच्या सहकाऱ्यांसह कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही त्यांचं अनुकरण केले. ते सर्व पाहून साधारण पाचशे लोकांचे हर्षोद्गार त्या कॅन्टीनमध्ये दुमदुमले. एक नको असलेली परंपरा तोडल्या गेली होती.
एक छोटीशी कृती ही मोठ्या मोठ्या भाषणांपेक्षा जास्त प्रभावी ठरते याचा प्रत्यय तिथे बसलेला सर्वांनाच आला होता.
कॅन्टीन असो अथवा कामाची जागा सर्व समान आहेत.
विश्वास आणि एकमेकांविषयीचा आदर हा चांगल्या संघटनेचा पाया आहे. आणि याद्वारेच आस्थापने प्रगती तसेच नवीन उंची गाठू शकतात. या सर्व व्हॅल्यूज त्या एका कृतीने प्रदर्शित झाल्या होत्या.
अर्थात त्यादिवशी पासून सर्व जण आपले ताट हे त्या विशिष्ट जागी ठेवायला लागले.
सचिन काळे ©️
1 comment:
खुप छान
Post a Comment