Sunday 2 December 2012

५ एस - जागरूकतेने केलेली स्वच्छता, मांडणी आणि व्यवस्थितपणा साठीची पाच सूत्रे


"५ एस संकल्पना म्हणजे केवळ स्वच्छता (House Keeping) नव्हे".

यामध्ये स्वच्छते सोबतच व्यवस्थितपणे केलेली मांडणी आणि नियमित सुधारणा हेही अंतर्भूत होय.

आपल्या रोजच्या आयुष्यातील गोष्टीना सिस्टीम बनवून त्याद्वारे कामामध्ये सुधारणा घडवून आणण्याची हातोटी जपानी लोकांनी खूपच चांगल्या पद्धतीने विकसित केलेली आहे त्याविषयी पुन्हा कधीतरी. आज मात्र आपण ५ एस बद्दल बोलू .


१ एस - SEIRI (Sort Out) - स्वच्छता - न लागणाऱ्या गोष्टी काढून टाकू या :

मित्रांनो आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अजूनही दसरा दिवाळी निमित्त पूर्ण घर स्वच्छ करायची पद्धत आहे. जर घर मातीचे असेल तर या निमित्ताने ते शेणामातीने लीम्पून सारवून काढतात तसेच रंग देखील देतात. हे करत असताना घरातील सर्व वस्तू , माळावरील जागेत टाकलेले कधीतरीच लागणारे साहित्य एकत्रित करून त्यातील लागणारे साहित्य आणि वस्तू स्वच्छ केल्या जातात तर बिनकामाच्या , तुटलेल्या मोडलेल्या खराब झालेले साहित्य वस्तू अवजारे हि मोडीत काढली जातात.

हे सर्व करतांना केवळ स्वच्छताच नाही तर एखादी वस्तू लागणारी आहे अथवा नाही यासंबधी निर्णय घेणे हे सर्वात महत्वाचे काम केले जाते. यालाच पहिला एस अथवा SEIRI असे म्हणतात.

१ एस केल्याने निर्णय क्षमते च्या विकासा सोबतच जागेची ही बचत होते.

आता आपल्या कामाच्या जागी जर या पद्धतीने समजून घेवून स्वच्छता केली गेली तर कामातील मजा अजून वाढेल यात शंकाच नाही.


२ एस - SEITON ( Systematic Arrangement) सुव्यवस्थित मांडणी - शोधाशोध थांबवू या:

प्रारंभिक स्वच्छते नंतर लागणाऱ्या वस्तूंचे देखील वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल
नियमित लागणाऱ्या म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तू
आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदाच लागणाऱ्या वस्तू
कधीतरीच म्हणजे वर्ष सहा महिन्यातून अथवा विशेष प्रसंगी लागणाऱ्या

आता असे वर्गीकरण केल्यानंतर नेहमी लागणाऱ्या वस्तू अथवा अवजारे चटकन मिळतील अशा पद्धतीने त्यांची मांडणी करता येईल.

तुम्ही गरेज वरील पान्हे आणि इतर अवजारे ठेवण्यासाठी केलेला फलक पाहिलाच असेल. त्यावरील एखादा पान्हा जर काढला गेला तर ते चटकन कळावे यासाठी तेथे त्याचे चित्र हि काढलेले असते.

थोडक्यात नेहमी लागणारी अवजारे, वस्तू ह्या चटकन दिसतील, मिळवता येतील अशी मांडणी.

नेहमी न लागणाऱ्या वस्तू थोड्या वेगळ्या पद्धतीने ठेवायच्या. उदा. आपली शैक्षणीक प्रमाणपत्रे आपण कायम सोबत ठेवत नाही याउलट वाहन चालवण्याचा परवाना मात्र आपण वाहन चालवताना सोबत ठेवतो.

२ एस चा फायदा म्हणजे वेळेची होणारी बचत. चला तर २ एस करू या आणि शोधाशोध थांबवू या.


३ एस - SEISO ( Shine everything) - समजून केलेली स्वच्छता:

व्यवस्थीत मांडणी केल्या नंतर स्वच्छतेचे वेळापत्रक ठरवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच ३ एस होय. आपल्या कार्य स्थळी असणाऱ्या दोषांना शोधणे आणि त्यावर कार्यवाही करणे तसेच दृश्यमानता वाढवणे याद्वारे आपण ३ एस ची पातळी गाठू शकतो.


४ एस - SEIKETSU (Standardization) - सुसूत्रता , प्रमाणीकरण :

व्यवस्थीत, स्वच्छ आणि अपघात मुक्त कार्यक्षेत्र बनवताना १, २ ,३ एस च्या माध्यमातून केले

गेलेल्या सुधारणा कायम करणे. प्रमाणीकरण करून जागा अधिकच सुंदर, सोपी करताना सुसूत्रता आणणे, दीर्घकालीन वाटचालीसाठी आवश्यक आहे हे सांगणारे हे ४ थे सूत्र आहे.


५ एस SHITSUKE (Self Discipline) - स्वयंशिस्त :

१ ते ४ एस द्वारे ठरवलेल्या सुधारणा ची नियमित अंमलबजावणी करण्यासाठी मानसिक तयारी करणे. चांगल्या सवयी अंगी बाणवणे याद्वारेच आपण ४ एस नियमित करू शकतो.


हि पाच सूत्रे केवळ कामाच्या जागेवरच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात देखील महत्वाची ठरतील.