प्रॉक्सी हजेरीची गोष्ट.
तर एकदा काय झालं एका कंपनीमध्ये रात्रपाळीला एक चोरी झाली.
पहिली पाळी सकाळी सात ते दुपारी साडेतीन म्हणजे साडेआठ तास.
त्यानंतर दुसरी दुपारी साडेतीन ते रात्री साडेअकरा म्हणजे आठ तास आणि रात्रीची तिसरी पाळी ती रात्री 11:30 पासून सकाळी सात वाजेपर्यंत असते म्हणजेच साडे सात तास.
यामध्ये रात्रीची पाळी ही साधारणतः अर्धा तास कमी असते.
अशाप्रकारे 24 तास कंपनी सुरू असते. एखाद्या वेळेस जर तितकीशी ऑर्डर नसेल तर मग दोन पाळ्यांमध्ये पण कंपनी सुरू असते.
गेल्या काही वर्षांपासून काही विशिष्ट विभागांमध्ये बारा तासांच्या दोन पाळ्या असतात.
तर रात्रपाळीला ही चोरी झाली त्यामध्ये एक लहान आकाराचा मशीनचा महागडा भाग शॉप फ्लोर वरून गायब झाला.
आता जसे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पेव फुटले आहे तसं त्यावेळेस नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी केव्हातरी या चोरीची माहिती ही पहिल्यांदा मेंटेनन्स विभागाच्या प्रमुखाला मिळाली त्यानंतर त्यांनी तिथे जाऊन त्याची खातरजमा केली आणि मग पुढील कार्यवाहीसाठी मनुष्यबळ विभागाला त्यामध्ये सम्मिलित केले.
त्यांच्यातर्फे पण तपासणी केली गेली. त्यामध्ये सिक्युरिटी तसेच रात्रपाळीचे शिफ्ट सुपरवायझर आणि अधिकारी यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्यानंतर त्यांनी पोलीस मध्ये रिपोर्ट दिला.
पोलीस आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम त्या दिवशीच्या रात्रपाळीला असलेल्या लोकांची यादी मागवली आणि त्यानुसार एकेकाची चौकशी करण्यास सुरुवात केली.
हे सुरू असताना एक जण मात्र त्या चौकशीसाठी आलाच नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर असं जाणवलं की तो दोन दिवस झाले कंपनीतच येत नाहीये. जरी त्याचं नाव रात्री उपस्थित असल्याच्या यादीत असलं तरी तो त्यादिवशी रात्रपाळीला कुणालाही दिसला नव्हता.
शेवटी त्याला त्याच्या घरून अक्षरशः धरून कंपनीमध्ये आणण्यात आलं.
पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने त्याची चौकशी केल्यानंतर वेगळीच गोष्ट समोर आली. हा कर्मचारी काय करायचा की तिसऱ्या पाळीच्या गाडीने कंपनी मध्ये यायचा. आल्यानंतर कार्ड पंचद्वारे त्याची हजेरी नोंदवायचा. त्यानंतर मध्ये जे वीस मिनिटांचा गॅप असायचं त्यादरम्यान तो दुसऱ्या पाळीच्या सुटणाऱ्या गाडीमध्ये सगळ्यात शेवटी जाऊन बसायचा आणि घरी निघून जात असे.
हे सर्व त्याने पोलिसांसमोर त्याच्या विभाग प्रमुखांना खरे पणाने सांगितले. विभाग प्रमुख त्याला ओळखत होते. त्यामुळे त्याच्यावर पोलीस केस वगैरे काही झाली नाही. परंतु अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई त्याच्यावर करण्यात आली. त्याचा रेकॉर्ड तपासला असता तो अशा प्रकारे नियमितपणे तिसरी पाळी न करता हजेरी लावण्यामध्ये पटाईत झालेला होता. हे करत असताना त्याच्या कंपनीने दिलेल्या रजा ह्या देखील शिल्लकच होत्या. ही सर्व तपासणी झाल्यानंतर त्याला राजीनामा देऊन जाण्यास सांगण्यात आले.
पुढे त्या चोरीचा तपास लागला आणि तो महागडा भाग परत मिळाला तसेच खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा पण झाली.
कॉलेजमध्ये प्रॉक्सी अटेंडन्स लावणे ही एक बऱ्यापैकी सर्वमान्य कला मानली जाते. परंतु अशा पद्धतीने आस्थापनांमध्ये अथवा संस्थांमध्ये जर कोणी वागू लागला तर त्याला त्याचा परिणाम एक दिवस भोगावाच लागतो.
- सचिन काळे ©️
No comments:
Post a Comment