Friday, 21 February 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २२- स्वप्न पेरा आणि खरी करण्यासाठी प्रयत्न करा.

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २२- स्वप्न पेरा आणि खरी करण्यासाठी प्रयत्न करा.

तर त्याच अस झालं एका कारखान्यामध्ये एक तरुण अभियंता शिकाऊ उमेदवार म्हणून लागला. 
त्या भागातील एका मोठ्या दुचाकी आणि तीन चाकी वाहन बनवणाऱ्या कारखान्यासाठी त्याची कंपनी इंजिनचे भाग बनवायची. 
त्या कंपनी मधल्या बहुतांशजणांनी त्या वाहन बनवणाऱ्या कंपनीला भेट दिली होती. ते आल्यावर याला सांगायचे की तिथं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. ते सगळं ऐकल्यानंतर याच्या मनात त्या कारखान्याला भेट देण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली.
कुठल्याही आस्थापनाला भेट देण्यासाठी काही पद्धती असतात तुमचे काम काय आहे, तुम्हाला कुणाला भेटायचे आहे, किती वेळ तुम्ही तिथे असणार आहात या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. जर तुम्हाला फक्त भेट देण्यासाठी यायचं असेल तर ते थोडसं अवघड असतं. अगदी आत्ता आत्ता पर्यंत उत्पादन करणारा कारखाना आत मधून संपूर्णपणे बघणे ही एक अप्रूप आणि नवलाईची गोष्ट होती. 
बरेच इंजिनिअरिंग कॉलेज औद्योगिक भेटी आयोजित करतात आणि उत्पादन जिथे प्रत्यक्ष केली जाते त्या कारखान्याची भेट आपल्या विद्यार्थ्यांना घडवून आणतात.
 आणि त्यावेळेस गुगल youtube आणि इंटरनेट या सगळ्या गोष्टींचं प्रचलन एवढं नव्हतं. त्यामुळे कारखान्यामध्ये कशा गोष्टी चालतात हे सामान्य जणांना कळण्याचा मार्ग हा फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया यांच्यामार्फत बनवण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या अभ्यासू फिल्मच्या माध्यमातून जात होतं. अथवा जुने हिंदी पिक्चर मध्ये विशेषता खलनायकाच्या आणि नायकाच्या हाणामारी दरम्यान एखादा कारखाना पार्श्वभूमीवर असायचा. 
चार्ली चॅप्लिन यांच्या मॉडर्न टाइम्स या चित्रपटामध्ये कारखान्याचे आणि त्यामध्ये चालणारे काम कसे यांत्रिक असते याचे अतिशय सुंदर विनोदी चित्रण करण्यात आलेले आहे. 
तर या अभियंत्याला तो कारखाना बघायचा होता मग कसं जायचं तर त्यातही एक मार्ग होता. तो म्हणजे मटेरियल घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये मटेरियल भरणारा आणि उतरवणारा जो व्यक्ती असतो ज्याला आपण क्लीनर असे म्हणतो तर त्या क्लिनरच्या जागेवर जायचं. कधीकधी मटेरियल साठी एखादा जास्तीचा माणूस पण त्या गाडीमधून जायचा.
याच मार्गाचा फायदा घेऊन हा तरुण शिकाऊ अभियंता मटेरियल घेऊन जाणाऱ्या 407 मध्ये बसून त्या मोठ्या कारखान्यामध्ये गेला. गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी त्याला एका ऑफिस जवळ सोडले आणि ते मटेरियल डिलिव्हरी करायला स्टोअर्स विभागाकडे गाडी घेऊन गेले. 

तर तिथे ऑफिस मधून आत गेल्यावर त्या मोठ्या कारखान्याच्या रिसेप्शन मध्ये त्याने एक भव्य फोटो पाहिला जिथे काही सुटाबुटातील वरिष्ठ अधिकारी एक अवॉर्ड जपान मध्ये भव्य मंचावर स्वीकारत होते. त्या फोटो मध्ये त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील अभिमान त्या चित्राकडे पाहत असलेल्या अभियंत्याला प्रेरणा देणारा होता.
तिथेच बाजूला त्या अवॉर्ड ची प्रतिकृती देखील सुंदर पद्धतीने लावलेली होती. त्यावर लिहिल होत JIPM TPM EXCELLENCE AWARD...

भारावून जाण्याचे दिवस असल्याने तिथं लय भारी काहीतरी आहे असं वाटून तो अभियंता बराच वेळ रेंगाळला.

तेवढ्यात पाठीवर थाप बसली. त्याच्या नजरेचा वेध घेत नुकताच आत आलेला वरिष्ठ अधिकारी म्हणाला " छान आहे ना.. पण ते मिळवण्यासाठी खूप काम करावं लागत... पण तू करशील... हे शिकून घे तुला ते खूप पुढं घेऊन जाईल..." परत एक वार पाठ थोपटून तो अधिकारी जसा आला तसाच झपाट्याने निघून गेला. जाता जाता त्या अभियंत्याच्या डोळ्यात स्वप्न पेरून गेला...

तर ते शिकायचं काय, कसं, कुठे 

ते होत उत्कृष्ट Excellence. त्यासाठी चे तत्व होत TPM - Total Productive Maintenance 

त्या स्वप्नाला डोक्यात घेऊन तो अभियंता चालत राहिला नवीन नवीन methods वापरून औद्योगिक क्षेत्रा मध्ये सुधारणा करत राहिला कधी यशस्वी झाला तर कधी अपयशामधून शिकत राहिला . 

आता त्या अवॉर्ड चे अप्रूप राहील पण त्यापेक्षा त्या प्रवासाची झिंग जास्त मोठी आहे.

रोज आपण जे करतो ते जास्त चांगल करू 
रोज च्या प्रयत्नाने आपण अधिक उत्कृष्ट होऊ
मग उत्कृष्ट काय वेगळे असेल.

आणि अवॉर्डस उत्कृष्ट तेच्या वाटेवर मिळत जातात.

पुढे त्या अभियंताने आणि त्याच्या टीमने अनेक अवॉर्ड मिळवले.

एखाद्याला त्याच्या पाठीवर हात ठेवून प्रेरणा दिली की चमत्कार घडतात.
माणसं प्रेरित होतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही प्रत्यक्षात येतात. 

स्वप्न पहा, 
स्वप्न पेरत रहा 
आणि 
ती पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले तर...

स्वप्न खरी होतातच.

सचिन काळे ©️

फोटो - वर्ष २०१६ लेखक टी पी एम गुरु S.Srinivasan san सोबत अवॉर्ड साठीचे असेसमेंट होत असताना.

No comments: