Sunday, 8 June 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २५ ध्येय - २

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २५ ध्येय - २
... मे आय कम इन सर असं म्हणत तो दरवाजा उघडून पूर्ण आत आला...
अजून एक पाऊल पुढे टाकत त्याने दरवाजा सोडला. तो त्याच्यामागे अलगद बंद झाला. बंद होताना शेवटी लॅच चा कट असा बारीकसा आवाज आला. त्या भल्या मोठ्या ऑफिस मध्ये आत आल्याबरोबर लक्ष्य जात होत ते मोठ्या मेज कडे त्यासमोर असलेल्या कमवलेल्या उंची चामड्याच्या कुशन असलेल्या तीन खुर्च्या, त्यापलीकडे मोठ्या कुशन च्या आणि उंच पाठीच्या खुर्चीवर बसलेल्या बिझनेस हेडकडे. ते त्यांच्या समोरच्या लॅपटॉप मधे बारीक नजरेने काही बघत होते. सोनेरी कड्याचा चष्मा थोडा नाकावर समोर आलेला. उंच भालप्रदेश सरळ नाक त्याखाली करड्या रंगाकडे झुकलेल्या तलवार कट मिश्या आणि टोकदार हनुवटी. आता थोड्या विचारात असल्याप्रमाणे हनुवटी खाली विसावलेले तर्जनी आणि अंगठा. त्यांनी चष्म्यातून याच्याकडे नजर टाकली आणि बसायला खूण केली. ती दहा पाऊल चटकन टाकत हा खुर्चीजवळ गेला. खुर्ची मागे ओढून त्यात अदबीने बसला. नेहमीप्रमाणेच त्या उंची कुशन मध्ये चार इंच आत रुतला. 
अजूनही बिझनेस हेड चे लक्ष्य हे लॅपटॉप च्याच स्क्रीन कडे होते. ते बसले होते त्यांच्या मागच्या भीतीवर मोठा फोटो होता संस्थापकांचा. डाव्या बाजूच्या भीतीवर मोठा जगाचा नकाशा त्यावर देशभर पसरलेले एकवीस प्लांट आणि बाहेर देशातील चार प्लांट खुणेने दाखविलेले. यांचा सर्व कारभार इथून हाकला जायचा.
त्याच्याच खालच्या बाजूला उंची सागवान पासून बनवलेले फाईल रॅक. त्याला लागून कोट अडकवायचे हँगर त्याच्या बाजूला ठेवलेली जेम्स बाँड सारखी काळी छोटी सुटकेस. उजव्या भिंतीवर लावले वेगवेगळे देश, विदेशात मिळालेले अवॉर्ड, त्याचे फोटो. त्यापुढे असलेली उंच खिडकी त्यावर सोडलेले फिकट रंगांचे पडदे.
मेजावर लॅपटॉप व्यतिरिक्त पेन स्टॅन्ड त्यात असलेले सोनेरी रंगांचे उंची फाऊंटन पेन हे सर्वच त्या ऑफिस ला एक वेगळी उंची आणत होत. मेजाच्या उजव्या बाजूला वेगवेगळी पुस्तके त्यात अगदी आताचे सेपियन्स - ब्रिफ हिस्ट्री ऑफ मॅनकाईंड - युवाल हरारी, how to win friends लिहिणारे डेल कार्नेगी, स्ट्रॅटेजीस असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके शिस्तीत ठेवलेली होती. त्यात लावलेल्या छोट्या कागदी चिट वाचनाची शिस्त दाखवत होत. सरांची वाचायची आवड त्याला चांगलीच ठाऊक होती. बिझनेस, इतिहास, मानसशास्त्र या विषयात त्यांची आवड आणि गती चांगलीच होती. ऑफिस मधे तर भरपूर पुस्तक होतीच त्याशिवाय सरांच्या घरी देखील एक मोठ ग्रंथालय त्यांनी बनवलेले हेही त्याला माहीत होत. बरेचदा काही संदर्भ लागले तर अमुक रांगेत ठेवलेले ते पुस्तक आणि त्याचा पान क्रमांक देखील ते सांगु शकत.
अजून एक दोन मिनिट गेल्यावर त्यांनी त्यांची नजर लॅपटॉपच्या स्क्रीन वरून हटवून याच्याकडे रोखली. चष्मा काढून त्यांनी हातात घेतला आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे भेदक नजरेने पहात त्यांनी क्षणभर विचार केला. विजय तुला आपला नागपूरचा प्लांट माहीत आहे. त्यावर याने हलकेच मान होकारार्थी हलवली. तर तिथे प्लांट हेड ची जागा रिकामी झाली आहे. आणि मागच्या दोन तिमाहीपासून काही वेगवेगळे प्रकार घडत आहेत आणि त्याचा परिणाम रिझल्टवर होत आहे. असं म्हणत त्यांनी डाव्या बाजूच्या ड्रॉवर मधून एक अहवाल काढला.आणि त्याच्यासमोर ठेवला. त्यावर मोठ्या लाल अक्षरात गोपनीय असं लिहिलेले. दुसरे पान बघ असं म्हणत ते मागे टेकून बसले. दोन्ही हाताची बोटे जुळवून मंदिर मुद्रा करत मान मागे टाकत ते त्याच्याकडे बघू लागले. हलकेच पुढे सरकत याने ती काळ्या रंगांची सूचिका जवळ ओढली आणि उघडून तो दोन क्रमांकाचे पान बारकाईने बघू लागला. 
ते म्हणजे बॅलन्स शीट होती. बॅलन्स शीट हा आस्थापनाच्या प्रकृतीचा आरसा असतो. जसं ECG रिपोर्ट हृदयाची प्रकृती कशी आहे हे दाखवत तसं एक बॅलन्स शीट हेही आस्थापनाची प्रकृती कशी आहे हे दाखवत. फक्त ज्याप्रमाणे एक ECG रिपोर्ट बघून डॉक्टर निदान करतो त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बघून आस्थापनाच्या प्रकृतीचे निदान करण्यासाठीही एक तयार दृष्टी बघणाऱ्याकडे असावी लागते.
( Good Observation Good Analysis-S Yamaguchi San TPM GURU
विजयने तो कागद डावीकडून उजवीकडे असा वाचत संपवला.
बॅलन्स शीट परत एकदा सूचिकेत ठेऊन ते परत देताना त्याचा चेहरा निर्विकार होता.
ती सूचिका पुन्हा जागेवर ठेवत. बिझनेस हेड त्यांच्या खुर्चीमध्ये जरा अजून आरामात बसले. तर हे असं आहे. मला आणि व्यवस्थापनाला असं वाटतं की तू काही दिवसांसाठी तिथे जावस. विचार कर निर्णय घे आणि मला सांग जास्तीत जास्त दोन दिवसात. त्यानंतर खास त्याच्यासोबत बोलण्यासाठीच असलेल्या खाजगी आवाजात हळुवारपणे ते म्हणाले अर्थात तू नकार देऊ शकतोस सविताशी बोल आणि मग मला सांग. 
तितक्यात दार हलकेच वाजले उघडलेल्या दारातून ऑफिस बॉय कॉफी चा ट्रे घेऊन आला. ब्लॅक कॉफीचं आरोमा त्या ऑफिसमध्ये सर्वत्र पसरला. ऑफिस बॉय कॉफीचे कप त्या दोघांसमोर ठेवून आवाज न करता निघून गेला.
सरांनी कॉफीचा कप उचलल्यानंतर विजयने त्याचा कप उचलला. सावकाश दोघेही कॉफीचे घोट घेऊ लागले. कडूसर चव जिभेवरून घशामध्ये उतरली. मघाचा इतरत्र पसरलेला अरोमा आता अगदी श्वासातून फुफ्फुसां पर्यंत जाऊन पोहोचला. कॅफेन मुळे चांगलीच तरतरी आली. 
अलगद कॉफीचा कप बशी मध्ये ठेवून ती कप बशी उचलून एका बाजूला ठेवत विजय खुर्ची मागं सरकवत सावकाश उठला. डायरी त्याने परत हाता मध्ये घेतली. सर मी सांगतो लवकरच. असं म्हणत हलकेच तो केबिनच्या बाहेर पडला. बिझनेस हेड यांनी परत एकदा त्यांच्या लॅपटॉप मध्ये डोकं घातलं...

Sunday, 16 March 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २४-ध्येय भाग१

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २४-  ध्येय भाग १

खरं सांगायचं तर त्याला हे प्लांट हेड पद नकोच होत. तो रमायचा शॉप फ्लोअर वर. नवीन पोरा सोराना अस काही पिडून घ्यायचा की पुढच्या वर्षभरातच ती पोरं टेक्निकल गोष्टीत बाप बनून जायची.
पण व्यवस्थापनाला त्याच्या मधील सुप्त गुणांची जाणीव होती. फक्त प्रोडक्शन हेड असला तरी त्याची तैल बुद्धी कठीणातील कठीण समस्या चुटकी सरशी सोडवायची त्यासोबतच त्याच्या कडे बॅलन्स शीट आणि व्यवसाय याविषयीचे फंडे क्लिअर होते. बरेचदा बिझनेस हेड हे याच्याशी अडचणीचे विषय बोलत आणि त्या चर्चे अंती त्यावर त्यांना चांगला मार्ग ही मिळे.
जेव्हा नागपूरच्या त्यांच्या एका प्लांट मध्ये अडचण निर्माण झाली आणि तिथला प्लॅन्ट हेड यांना काही वैयक्तिक कारणांनी कंपनी बाहेर जावं लागलं त्यावेळेस बिझनेस हेडना याचा चेहरा आठवला. खरं तर संभाजीनगर आणि नागपूर हे काही फार दूर नाही. आणि याने जेव्हा नागपूरचा प्रकल्प उभा राहत होता तेव्हा तिथे कामही केलेले. अशा सगळ्या जमेच्या बाजू त्यांच्या डोळ्यापुढे झर्रकन गेल्या.
सकाळी सकाळी हा आपला शॉप फ्लोअर वर राऊंड घेत असताना बिझनेस हेड त्याला शोधत शोधत तिथे आले.
त्याच्या सोबत शॉप फ्लोअर वर चालता चालता नेहमी प्रमाणे त्यांनी त्याच्या खाद्यावर हात ठेवला. एखादी गुप्त गोष्ट सांगावी त्याप्रमाणे खालच्या आवाजात त्याला सांगितलं की नागपूर प्लांट मध्ये एक जागा झाली आहे आणि तू तिथ जावं अस मला वाटत. अर्थात तू तयार असशील तर आपण पुढ बोलू. मला दुपारपर्यंत सांग अस म्हणत नेहमीप्रमाणे मिश्किल हसत बिझीनेस हेड लांब पावलं टाकत त्यांच्या वरच्या मजल्यावरील ऑफिस कडे निघून गेले. आणि हा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिला....
राऊंड संपवून तो जागेवर टेकला. आणि रोजचे रिपोर्ट असलेले ईमेल बघायला सुरुवात केली. तितक्यात मघाचे बिझीनेस हेड चे बोलणे आणि त्यातील नागपूर नाव आठवताच बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या आठवणी मधून वर येऊ लागल्या. 
नागपूर म्हणजे रसाळ आंबट गोड संत्री आणि गर्मी. तिखट जेवण आणि माणसं ही बोलायला तिखट, तेज पण मोकळी ढाकळी. अगदी बोलतानाही करून राहिलो जाऊन राहिलो असं डब्बल क्रियापद वापणारी. मुळातच सुपीक जमीन आणि भाषेमध्ये असलेले भरपूर शब्द आणि त्याचा सढळ वापर वैदर्भि पाहुणचाराप्रमाणेच करणार मोठ मन. एके काळी मध्य प्रांताची राजधानी असणार हे शहर संयुक्त महाराष्ट्रात मोठ्या मनाने उपराजधानी बनून सामील झालेले. हे असे आगा पिछा नसलेले विचार करता करता त्याचा मोबाईल वाजला.
विजय तू जरा माझ्या केबिन मधे येतोस थोड तातडीच आहे. बिझनेस हेड चा आवाज त्याच्या कानात गुंजला. नेहमीप्रमाणे एक शब्दही अधिक न बोलता आणि मोबाईलचे बिल न वाढवत समोरून फोन कट झाला.
संगणकाकडे आणि त्यावरील उत्पादन अहवाला कडे एक वार नजर टाकून याने खुर्ची मागे सरकवली, नेहमीप्रमाणे चाकांचा  चुई चुई आवाज झाला.  संगणक बंद करून त्याने त्याची डायरी उचलली खिशाला पारकर चे पेन आहे याची खात्रि केली. एकवार केसात हात घालून आधीचेच व्यवस्थित असलेले केस परत एकवार व्यवस्थित करून तो त्याच्या केबिन बाहेर पडला. 
तो बाहेर आला तसा त्याचीच वाट पाहत थांबलेले त्याचे सुपरवायझर त्याच्याकडे आले. त्यांना हातानेच थांबवत तो म्हणाला वर जाऊन येतो. काही तातडीच आहे का. त्यांच्या नकारार्थी हलेल्या माना बघत तो जिन्याकडे चालू लागला.
दोन जिने नेहमीप्रमाणे झपाझप चढून तो वरच्या मजल्यावर आला. एव्हढे वेगात जिने चढल्याने थोडीही धाप लागली नाही हे जाणवून परत एकदा स्वतःला शाबासकी देत आणि बायकोला धन्यवाद देत तो पुढे चालू लागला.
मागच्या सहा महिन्यांपासून त्याची बायको  त्याला रोज पाच किलोमीटर चालायला जावं म्हणून माग लागायची. अर्थात त्याच्या  मानसिक आणि शारीरिक फिटनेस यामागे तिचा मोठाच वाटा होता.
जसं  आपण वर जातो तस तस वातावरण विरळ व्हायला लागत आणि आवाज देखील कमी होत जातात.
खाली शॉप फ्लोअर वर मशीन चा आवाज, मटेरियल वाहून नेणाऱ्या ट्रॉलीच्या लोखंडी चाकांचा खडखडाट, धातूला आकार देताना घातल्या जाणाऱ्या घणाचा येणारा ठण ठण आवाज, कामगारांचे आवाज आणि मशिनरीच्या वरताण त्यांच्यावर ओरडून बोलणाऱ्या सुपरवायझरचे आवाज. पेंटशॉप मध्ये कन्वेअर वर पार्ट लावताना पडून होणारा आवाज.
पण या मजल्यावर मात्र त्यातील एकही आवाज यायचा नाही. कंपनीचे मुख्यालय असलेला हा मजला इथल्या विरळ हवेत आवाज असायचा तो सेंट्रल एसीचा आणि कॉफी मशीनच्या वाफेचा. तिथलं बोलणही अगदी मोजून मापून. सर्वत्र एक गंभीर वातावरण. महोगणी लाकडा पासून बनवलेल्या भिंती त्यावर एखादेच चित्र.  त्यावर सोडलेला पिवळा लाईट. नेहमीप्रमाणे तिथे तो थोड रेंगाळला आणि नेहमीप्रमाणेच त्याला त्यावरील सही वाचता आली नाही... 
त्या सर्व मजल्याला एक भव्य असं व्यक्तिमत्व होतं. एवढ्या मोठ्या जागेत तीनच ऑफिस एक संस्थापकांचे, दुसरे बिझनेस हेड यांचे आणि तिसरे कायम मोकळे. 
आणि त्यासोबतच एक नंदीचे डेस्क त्यावर एक मोठ्या स्क्रीनचा कम्प्युटर, त्यासोबतच प्रिंटर, आणि कागद बारीक तुकडे करणारी मशीन. दोन तीन कॅलेंडर त्यावर केलेल्या वेगवेगळ्या नोंदी. बाजूला तीन पेन बॉक्स त्यात वेगवेगळे पेन पेन्सिल हायलाईटर पेन स्टेपलर. बाजूच्या टेबलावर तीन ट्रे त्यात सर्वात वरच्या ट्रे मध्ये बिझनेस हेडच्या सही साठीचे कागद, दुसऱ्या मध्ये सही झालेले कागद तर सर्वात खालच्या ट्रे मधे अधिकची माहिती मागणारे अथवा प्रत्यक्ष भेटा असा निरोप असलेले कागद. त्याला बरेचदा लाल पिवळा अथवा हिरव्या रंगाच्या पोस्ट इट  कागद लावलेला असे त्यावर बिझनेस हेड च्या सुंदर हस्ताक्षरात फाऊंटन पेनने काही नोंदी देखील असत. 
नंदीचे टेबल नेहमीच स्वच्छ असे. एकही फाईल त्याच्याकडे वाट पाहते आहे असे कधीच झाले नाही. कायम गंभीर असणारे नंदी हे त्या ऑफिसला साजेसेच होते. मूळ संस्थापकांच्या हाताखाली ऑफिस बॉय असलेले नंदी तोंड बंद आणि कान उघडे ठेवत तयार झालेले. आणि ऑफिस बॉय ते आता एक्झिक्युटिव्ह असिस्टंट अशी प्रगती याच कमी बोलणे आणि जास्त काम करण्यामुळे झाली.
नंदी याचं मूळ नाव काही वेगळेच पण जस महादेवाकडे जाताना नंदी महाराजांचे दर्शन होत तसं बिझनेस हेड कडे जाताना त्यांच्या सहायकाचे दर्शन होत.
याला पाहताच नंदी म्हणाले आलास तू, सरळ आत जा तुझीच वाट पाहत आहेत. त्यावर होकारार्थी मान हलवत हा पुढे झाला. 
डायरी डाव्या काखेत पकडत आणि डावा हात पितळी नॉब वर ठेवत उजव्या हाताने त्याने दरवाजावर हलकेच टक टक केले. आतून अस्पष्ट असा कमिंग आवाज ऐकल्यावर डाव्या हातातील नॉब फिरवत त्याने दरवाजा उघडला आणि उजव पाऊल आत टाकलं. मे आय काम इन सर असं म्हणत तो दरवाजा उघडून पूर्ण आत आला...

Saturday, 8 March 2025

करिअरची गुणसूत्रे - डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर

करिअरची गुणसूत्रे - डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर

डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर यांनी लिहिलेले करिअरची गुणसूत्रे हे पुस्तक विद्यार्थी नोकरदार आणि ज्यांना शिकण्याची मुख्यत्वे स्वतःला अद्यावत करण्याची इच्छा आहे त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे. 
तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहेत. हा वेग अगदी भोवळ आणणारा आहे. काल जे ज्ञान आणि कौशल्य याद्वारे हमखास रोजगार मिळत होता त्यावर याचा परिणाम होत असून वेगळ्या प्रकारचे रोजगार आज निर्माण होत आहे यासाठी नवीन कौशल्य आणि ज्ञान गरजेचे असून ते आत्मसात करणे आणि स्वतःला नवीन स्पर्धेसाठी तयार ठेवणे यासाठी हे पुस्तक नक्कीच मदतीचे ठरेल. 
गेल्या काही वर्षांमध्ये मुलाखती घेत असताना उमेदवार हे अजूनही पारंपारिक पद्धतीनेच विचार करतात तसेच इंडस्ट्री 4.0, ए आय आणि आजकाल ज्याचा खूप बोलबाला झालेला आहे ते चॅट जीपीटी सारखे तंत्र याविषयी बहुतेक जण अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. 
आमच्या आस्थापनामध्ये याविषयी एक इनोव्हेशन सेल बनवण्यात आला असून त्याद्वारे व्यवस्थापक आणि विभाग यांची उत्पादकता कशी वाढवता येईल याविषयी अभ्यास सुरू आहे. या तिन्ही नवीन संज्ञांचा वापर उत्पादन तसेच रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्यासोबतच सप्लाय चेन मॅनेजमेंट या विभागांमध्ये करणे सुरू झाले आहे. 
या पुस्तकाचं त्यात सांगितलेला तंत्राचा उपयोग कसा होऊ शकतो याचे एक उदाहरण म्हणजे गेले काही वर्षांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी चांगली आस्थापनं मिळत नाहीत तर यावर यामध्ये एक धडा क्रमांक 15 असून इंटर्नशिप साठी वेगवेगळ्या वेबसाईट दिलेल्या असून घरबसल्या मोबाईल द्वारे इंटरशिप शोधता येईल त्यासोबतच ती वर्चुअली देखील करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 
त्यासोबतच करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे वेगवेगळे विषय उदाहरणांसह त्यासोबतच मुख्यत्वे ऑनलाइन आणि नाम मात्र शुल्क अथवा अगदी विना मोबदला कशा पद्धतीने करता येईल यासाठीच्या वेबसाईट वेगवेगळे ॲप्स यांची देखील माहिती देण्यात आलेली आहे विषयांचे नाव बघितले तर त्याचे महत्त्व समजून येईल उदाहरणार्थ टाईम मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, पेटंट, डिजिटल प्रेझेन्स, जॉब शोधताना इत्यादी इत्यादी. 
एकंदरच स्वतःला अद्यावत करण्यासाठी ह्या लेखक द्वयीने लिहिलेले करिअरची गुणसूत्रे हे पुस्तक खूप उपयोगी ठरणार आहे. मराठी भाषेमध्ये एवढे सुंदर पुस्तक आणल्याबद्दल दोघांचेही खूप खूप कौतुक आणि आभार.
 
सचिन काळे


Monday, 24 February 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २३- दुनिया गोल आहे

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २३- दुनिया गोल आहे

माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे " you can change friends but not neighbours".
उत्पादन क्षेत्रामध्ये हेच वाक्य थोडंसं वेगळं करून म्हणता येईल " you can change organisations but not colleague / boss"
आयुष्याच्या टप्प्यावर बरेचदा आपली गाठ जूने मित्र, स्नेही, परिचित यांच्याशी वेगवेगळ्या वेळी पडते आणि मग आपण म्हणतो अरे दुनिया गोल आहे.
एक गावात एका वर्गात शिकणारे दोन विद्यार्थी त्यांच आपसात कधीच जमलं नाही परंतु अभियांत्रिकी करायला त्या दोघांचाही नंबर एकाच कॉलेजला आणि बाहेरगावी लागला. इतकी वर्ष एकमेकांशी न जमणारे हे दोघे त्या नवीन गावात नवीन कॉलेजमध्ये एकत्र रुजू झाले आणि कॉलेज संपेपर्यंत एकाच रूममध्ये राहिले. जुळवून घेता घेता ते दोघं खूप चांगले मित्र पण झाले. असे उदाहरण आपल्या आसपास भरपूर असतील.
 मात्र उत्पादन क्षेत्रातील आज एक जी गोष्ट सांगणार आहे ती मानवी स्वभाव सांगणारी आहे.
तर झालं असं की एका मोठ्या वाहन उत्पादन कंपनीमध्ये एक जण त्यांना आपण प्रशांत म्हणूयात तर हे प्रशांत एका विभागामध्ये रुजू झाले. प्रशांत यांचा  अनुभव बराच मोठा होता. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून आलेले तसेच वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्स भात्यात  असलेले प्रशांत हे लवकरच सगळ्यांच्या गळ्यातले ताईत झाले. त्या विभागातील अनागोंदी आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी संपवली आणि तो विशिष्ट विभाग हा पूर्ण क्षमतेने काम करू लागला. 
पुढे काही महिन्यानंतर त्याच विभागांमध्ये परंतु कॉर्पोरेट लेवलला अजून एक साहेब आले त्यांना आपण अजय म्हणू. तसं पाहिलं तर प्रशांत यांचं रिपोर्टिंग हे प्लांट मध्ये होतं आणि कॉर्पोरेटशी त्यांचा थेट संबंध नव्हता. तरी दखील अजय यांनी प्रशांत यांच्या विभागामध्ये दखल द्यायला सुरुवात केली. एवढेच नाही तर पुढच्या काही महिन्यांमध्ये  त्यांनी प्रशांत यांच्या कामांमध्ये चुका काढायला सुरुवात केली तसेच त्यावरून त्यांना सगळ्यांसमोर आणि माघारी अद्वातद्वा बोलायला सुरुवात देखील केली. प्रशांत यांचे कामाचे तास वाढले तसेच त्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला जे हसू असायचे ते देखील गायब झालं. 
या दोघांमध्ये काही ठीक नाहीये हे सगळ्यांना जाणवायला लागले. त्यातच त्या विभागामध्ये एक जुनी झालेली चूक अजय यांनी शोधली आणि त्या चुकीची जबाबदारी प्रशांत यांच्यावर टाकून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. तसं पाहिलं तर त्या गोष्टीचा आणि प्रशांत यांचा काहीही संबंध नव्हता तरी देखील त्यांना शेवटी राजीनामा द्यावा लागला. 
प्रशांत कंपनी बाहेर पडल्यानंतर पुढे काही महिन्यांमध्येच अजय यांना पण आस्थापनाने जायला सांगितले त्याचे कारण असे होते की अजय यांनी कोड ऑफ कंडक्ट फॉलो केलेला नाही.
इथून बाहेर पडल्यानंतर प्रशांत यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांचे आता बरे चालले आहे. 
पुढे काही काळ लोटल्यानंतर कळाले की सुरुवातीच्या काळामध्ये अजय आणि प्रशांत हे एकाच आस्थापनामध्ये होते त्या ठिकाणी अजय हे प्रशांत यांना रिपोर्ट करायचे. त्याही ठिकाणी अजय यांनी कोड ऑफ कंडक्ट फॉलो केला नाही म्हणून प्रशांत हे साहेब असताना त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली होती आणि त्यांना नोकरी सोडावी लागली होती. जरी ते दोघे त्या कंपनीतून बाजूला झाले तरी पुढे अनेक वर्षानंतर जो आधी साहेब होता तो ज्युनिअर झाला आणि जो ज्युनिअर होता तो साहेब झाला. 
आपण कंपनी बदलू शकतो परंतु आपला जुनियर अथवा वरिष्ठ बदलू शकत नाही. शेवटी कुठे ना कुठे आपली भेट होत असते.
कारण दुनिया गोल आहे.

आता वरील कथेत कोण चूक अथवा कोण बरोबर हे महत्त्वाचे नाही तर
      नवीन ठिकाणी गेल्यावर जुनी पाटी कोरी करायला पाहिजे.
जून पुराणे हिशेब तिथेच सोडून द्यायला हवे.
कुठल्याही आस्थापनाचे / विभागाचे यश हे टीमवर्क किती चांगले आहे यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.

आणि शेवटी सर्वात महत्वाचे 
कुठेही वागताना आपण संत रामदासांनी छ. संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे  वागलो तर नुकसान मुळीच होणार नाही.

अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||

सचिन काळे ©️ 

लिंक मध्ये शिवराजास आठवावे हे संत रामदास यांनी लिहिलेले पत्र

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82

Friday, 21 February 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २२- स्वप्न पेरा आणि खरी करण्यासाठी प्रयत्न करा.

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २२- स्वप्न पेरा आणि खरी करण्यासाठी प्रयत्न करा.

तर त्याच अस झालं एका कारखान्यामध्ये एक तरुण अभियंता शिकाऊ उमेदवार म्हणून लागला. 
त्या भागातील एका मोठ्या दुचाकी आणि तीन चाकी वाहन बनवणाऱ्या कारखान्यासाठी त्याची कंपनी इंजिनचे भाग बनवायची. 
त्या कंपनी मधल्या बहुतांशजणांनी त्या वाहन बनवणाऱ्या कंपनीला भेट दिली होती. ते आल्यावर याला सांगायचे की तिथं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. ते सगळं ऐकल्यानंतर याच्या मनात त्या कारखान्याला भेट देण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली.
कुठल्याही आस्थापनाला भेट देण्यासाठी काही पद्धती असतात तुमचे काम काय आहे, तुम्हाला कुणाला भेटायचे आहे, किती वेळ तुम्ही तिथे असणार आहात या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. जर तुम्हाला फक्त भेट देण्यासाठी यायचं असेल तर ते थोडसं अवघड असतं. अगदी आत्ता आत्ता पर्यंत उत्पादन करणारा कारखाना आत मधून संपूर्णपणे बघणे ही एक अप्रूप आणि नवलाईची गोष्ट होती. 
बरेच इंजिनिअरिंग कॉलेज औद्योगिक भेटी आयोजित करतात आणि उत्पादन जिथे प्रत्यक्ष केली जाते त्या कारखान्याची भेट आपल्या विद्यार्थ्यांना घडवून आणतात.
 आणि त्यावेळेस गुगल youtube आणि इंटरनेट या सगळ्या गोष्टींचं प्रचलन एवढं नव्हतं. त्यामुळे कारखान्यामध्ये कशा गोष्टी चालतात हे सामान्य जणांना कळण्याचा मार्ग हा फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया यांच्यामार्फत बनवण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या अभ्यासू फिल्मच्या माध्यमातून जात होतं. अथवा जुने हिंदी पिक्चर मध्ये विशेषता खलनायकाच्या आणि नायकाच्या हाणामारी दरम्यान एखादा कारखाना पार्श्वभूमीवर असायचा. 
चार्ली चॅप्लिन यांच्या मॉडर्न टाइम्स या चित्रपटामध्ये कारखान्याचे आणि त्यामध्ये चालणारे काम कसे यांत्रिक असते याचे अतिशय सुंदर विनोदी चित्रण करण्यात आलेले आहे. 
तर या अभियंत्याला तो कारखाना बघायचा होता मग कसं जायचं तर त्यातही एक मार्ग होता. तो म्हणजे मटेरियल घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये मटेरियल भरणारा आणि उतरवणारा जो व्यक्ती असतो ज्याला आपण क्लीनर असे म्हणतो तर त्या क्लिनरच्या जागेवर जायचं. कधीकधी मटेरियल साठी एखादा जास्तीचा माणूस पण त्या गाडीमधून जायचा.
याच मार्गाचा फायदा घेऊन हा तरुण शिकाऊ अभियंता मटेरियल घेऊन जाणाऱ्या 407 मध्ये बसून त्या मोठ्या कारखान्यामध्ये गेला. गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी त्याला एका ऑफिस जवळ सोडले आणि ते मटेरियल डिलिव्हरी करायला स्टोअर्स विभागाकडे गाडी घेऊन गेले. 

तर तिथे ऑफिस मधून आत गेल्यावर त्या मोठ्या कारखान्याच्या रिसेप्शन मध्ये त्याने एक भव्य फोटो पाहिला जिथे काही सुटाबुटातील वरिष्ठ अधिकारी एक अवॉर्ड जपान मध्ये भव्य मंचावर स्वीकारत होते. त्या फोटो मध्ये त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील अभिमान त्या चित्राकडे पाहत असलेल्या अभियंत्याला प्रेरणा देणारा होता.
तिथेच बाजूला त्या अवॉर्ड ची प्रतिकृती देखील सुंदर पद्धतीने लावलेली होती. त्यावर लिहिल होत JIPM TPM EXCELLENCE AWARD...

भारावून जाण्याचे दिवस असल्याने तिथं लय भारी काहीतरी आहे असं वाटून तो अभियंता बराच वेळ रेंगाळला.

तेवढ्यात पाठीवर थाप बसली. त्याच्या नजरेचा वेध घेत नुकताच आत आलेला वरिष्ठ अधिकारी म्हणाला " छान आहे ना.. पण ते मिळवण्यासाठी खूप काम करावं लागत... पण तू करशील... हे शिकून घे तुला ते खूप पुढं घेऊन जाईल..." परत एक वार पाठ थोपटून तो अधिकारी जसा आला तसाच झपाट्याने निघून गेला. जाता जाता त्या अभियंत्याच्या डोळ्यात स्वप्न पेरून गेला...

तर ते शिकायचं काय, कसं, कुठे 

ते होत उत्कृष्ट Excellence. त्यासाठी चे तत्व होत TPM - Total Productive Maintenance 

त्या स्वप्नाला डोक्यात घेऊन तो अभियंता चालत राहिला नवीन नवीन methods वापरून औद्योगिक क्षेत्रा मध्ये सुधारणा करत राहिला कधी यशस्वी झाला तर कधी अपयशामधून शिकत राहिला . 

आता त्या अवॉर्ड चे अप्रूप राहील पण त्यापेक्षा त्या प्रवासाची झिंग जास्त मोठी आहे.

रोज आपण जे करतो ते जास्त चांगल करू 
रोज च्या प्रयत्नाने आपण अधिक उत्कृष्ट होऊ
मग उत्कृष्ट काय वेगळे असेल.

आणि अवॉर्डस उत्कृष्ट तेच्या वाटेवर मिळत जातात.

पुढे त्या अभियंताने आणि त्याच्या टीमने अनेक अवॉर्ड मिळवले.

एखाद्याला त्याच्या पाठीवर हात ठेवून प्रेरणा दिली की चमत्कार घडतात.
माणसं प्रेरित होतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही प्रत्यक्षात येतात. 

स्वप्न पहा, 
स्वप्न पेरत रहा 
आणि 
ती पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले तर...

स्वप्न खरी होतातच.

सचिन काळे ©️

फोटो - वर्ष २०१६ लेखक टी पी एम गुरु S.Srinivasan san सोबत अवॉर्ड साठीचे असेसमेंट होत असताना.

Thursday, 30 January 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २१ मजेची सजा

त्या दिवशीची पहिली शिफ्ट देखील नेहमीप्रमाणे सुरू झाली. नुकताच आलेला सुरक्षा अधिकारी (safety officer) जागेवर बॅग ठेवून कॅन्टीनला जायच का याचा विचार करत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला. बघितलं तर सिक्युरिटीने फोन केला होता. कानाला लावून त्याने बोलणे केले.
कॅन्टीनला जायचं आणि नाश्ता करायचा विचार रहित करून सुरक्षा अधिकारी ओ एच सी विभागात धावला. 
तिथे जाऊन बघतो तर सात आठ कामगारांचा घोळका एकाला मध्ये ठेवून उभा होता. रात्रपाळीचा ओ एच सी चा कर्मचारी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता. 
इथं ओ एच सी विषयी थोडसं.
 Occupational health center अर्थात कंपनीमध्ये असलेली प्रथम उपचाराची जागा. या ठिकाणी बहुतांश वेळा दिवसा एखादा शिकवू डॉक्टर अथवा कंपनी जर खूप मोठी असेल तर निवृत्त झालेला डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध असतो. एक अथवा दोन बेड कधीकधी ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर प्रथम उपचार करण्यासाठी लागणारी सामग्री तसेच अँब्युलन्स देखील येथे उपलब्ध असते. रात्रपाळीच्या वेळेस कंपनीमधीलच काही जण ज्यांना फर्स्ट एड कशी द्यावी याचे ट्रेनिंग मिळालेले असते असे कर्मचारी कामगार हे काम बघतात. कुठल्याही कंपनीमध्ये कच्च्या मालाचे रूपांतरण पक्क्यामालामध्ये करताना वेगवेगळ्या प्रोसेस, मशीन त्यासोबतच वेगवेगळे ज्वालाग्रही पदार्थ जसे की एलपीजी अथवा पीएनजी किंवा इलेक्ट्रिसिटी चा वापर करून चालवले जाणारे ओवेन असे वेगवेगळे उपकरणे असतात. त्या व्यतिरिक्त बरेचसे काम हे माणसांकडून केले जाते त्यामध्ये ठोकपिट करणे आले अथवा काही गोष्टी उघडणे बंद करणे असेंबली करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करताना छोटे-मोठ्या इजा होऊ शकतात. अर्थात त्यासाठी कुठलेही कार्य करण्यासाठीची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरवलेली असते. त्यासोबतच वेगवेगळ्या विभाग आणि प्रोसेस यांचे सुरक्षेचे च्या दृष्टीने अति धोकादायक धोकादायक आणि सामान्य असे वर्गीकरण केलेले असते आणि त्यानुसार तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण दिलेले असते. या प्रशिक्षणामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई याचा वापर करणे. कुठल्याही प्रकारची तातडीची अथवा गंभीर परिस्थिती उद्भवल्यास काय कार्यवाही केली पाहिजे याचेही ट्रेनिंग यामध्ये अंतर्भूत असते. सुरक्षा अधिकारी हे नियमित अंतराने रंगीत तालीम द्वारे बघतात की कंपनीचा एखाद्या अपघातजन्य अथवा आपातकालीन परिस्थिती दरम्यानचा प्रतिसाद देण्याचा वेळ काय आहे. आणि या रंगीत तालमीमध्ये सर्व जण कशा पद्धतीने काम करतात हे देखील बघितले जाते आणि मग त्या मध्ये आढळलेल्या त्रुटींवर कार्यवाही देखील केली जाते. 
तर परत एकदा आपण या ओएचसीच्या गोंधळाकडे येऊया. तिथे गेल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्याने तिथे येऊन थांबलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्यांना सर्वांना बाजूला व्हायला सांगितले त्याच दरम्यान फर्स्ट एड करणारे दोघेजण तिथे उपस्थित झाले. ज्या व्यक्तीला लागले होते त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आले की त्याचा हात मोडला आहे. 
त्याचे निरीक्षण करून त्याला दोन लाकडी पट्ट्याच्या आधाराने तात्पुरते बँडेज करण्यात आले आणि तो हात त्याच्या गळ्यात बांधण्यात आला. तसेच वेदनाशामक गोळ्या देऊन त्याला कंपनीच्या ॲम्बुलन्स मध्ये बसून जवळच्या इस्पितळामध्ये पाठवण्यात आले. 
इकडे सुरक्षा अधिकाऱ्याने त्याचा प्राथमिक रिपोर्ट तयार केला तसेच ज्या ठिकाणी म्हणजे शॉप फ्लोअर वर ही घटना घडली तिथेही त्याने भेट देऊन पाहणी केली आणि तिथे काम करणाऱ्या लोकां च्या मुलाखती घेतल्या. 
ही घटना रात्रपाळी संपताना आणि दिवस पाळी सुरू होताना घडलेली असल्यामुळे फार काही सविस्तर माहिती मिळू शकली नाही. 
त्यानंतर सुरक्षा अधिकारी एडमिन विभागाच्या अधिकाऱ्याला घेऊन दवाखान्यात गेला आणि त्या व्यक्तीची मुलाखत घेतली तसेच डॉक्टरांना भेटून त्याच्या प्रकृतीचा अहवाल विचारला. दरम्यान एक्स-रे आणि इतर तपासणी द्वारे हाताचे हाड मोडले असून त्याची एक छोटी सर्जरी करावी लागेल अशा निदानास डॉक्टर आले होते. त्यावर जी कार्यवाही करावी लागेल ती करा असे सांगून ही जोडगोळी परत एकदा त्या व्यक्तीला भेटली. 
हे का झाले याविषयी त्या व्यक्तीने असे सांगितले की सकाळी मी तिथे चाललो असताना माझा पाय घसरला आणि मी पडलो आणि त्या दरम्यान हात टेकवतांना माझा हात मोडला. त्याचे हे उत्तर ऐकून घेतल्यानंतर सुरक्षा अधिकारी विचारात पडला कारण सकाळी जेव्हा त्याने त्या शॉप फ्लोअर वरील जागेला भेट दिली होती तेव्हा लक्षात आले की तिथे कुठल्याही प्रकारचे पाय घसरून पडण्यासारखे कारण नाही. तिथे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा कुलंट अथवा ऑइल गळती आढळली नाही. 
परत एकदा त्या व्यक्तीला हे का झाले असे विचारले असता त्यांनी आधीचेच पालुपद सुरू ठेवले.
त्याने सांगितलेल्या गोष्टींची आपल्या अपघात कारण मीमांसा रिपोर्टमध्ये नोंदणी करून सुरक्षा अधिकारी आणि एडमिन अधिकारी यांनी त्याला तुझ्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि त्याचा खर्च कंपनी करेल तसेच तू आता सुट्टीवर असताना तुझा पगार देखील चालू राहील असे सांगून आश्वस्त केले.
त्याचा निरोप घेऊन परत येताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात आलेले विचार एडमिन अधिकाऱ्याला सांगितले की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घसरण्याची अथवा पडण्याची परिस्थिती नाही तिथे हा घसरून पडतो कसा आणि याचा हात मोडतो कसा याचा काही थांग लागत नाही.
त्यावर ॲडमिन अधिकारी म्हणाला एवढेच ना चला तुम्हाला मी काहीतरी दाखवतो कारण आपण पूर्ण शॉप फ्लोअरला सीसीटीव्ही द्वारे निगराणीत आणलेले आहे. तो नेमका व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळेल की तिथे खरंच काय झालेले आहे. 
पुढे साधारण दोन महिन्यानंतर ती हात मोडलेली आणि आता दुरुस्त झालेली व्यक्ती परत कामावर रुजू झाली. त्याच्या कामाच्या पहिल्याच दिवशी त्याला एडमिन विभागात बोलवण्यात आले आणि त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि घरी पाठवण्यात आले. 
कारणे दाखवा नोटीस ही खोटे बोलणे आणि शॉप फ्लोअरवर अयोग्य पद्धतीने वागणे यासाठी बजावण्यात आली होती. 
हे असे घडण्यामागे कारण होते त्या दिवशी रेकॉर्ड झालेला तो व्हिडिओ. सुरक्षा अधिकारी आणि एडमिन अधिकारी यांनी सिक्युरिटी विभागामध्ये असलेल्या मॉनिटरवर तो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आढळून आले की अपघात झालेली व्यक्ती ही त्या दिवशी शॉप फ्लॉवर वर एक रिंग घेऊन पळत होती जसे लहान मुले टायर पळवतात तसे आणि पळता पळता तोल जाऊन पडली आणि नेमकी हातावरच पडली आणि त्याचा हात मोडला. 
पुढे त्या व्यक्तीने माफीनामा लिहून दिला. तसेच यापुढे अशाप्रकारे अयोग्य वर्तणूक करणार नाही असे लिखित आश्वासन दिले. त्याची त्याआधीची वागणूक आणि काम बघून एडमिन विभागाने उत्पादन विभागाशी चर्चा केली आणि त्याला ताकीद देऊन परत एकदा कामावर रुजू करून घेतले. 

शॉप फ्लोअर असो अथवा ऑफिस या ठिकाणी सावधगिरी बाळगून जी काही एसओपी अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवलेली आहे ती पाळणे हे प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांचे कर्तव्य आहे. 
कामाच्या ठिकाणी खेळाचे मैदान समजून जर कोणी खेळत असेल, मजा करत असेल तर त्याला सजा मिळायला वेळ लागत नाही.

सचिन काळे ©️

Monday, 20 January 2025

मनुफॅक्चरींग च्या गोष्टी २०- शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।

आज परत एकदा मेंटेननस हेडला सकाळच्या मीटिंग मध्ये ओरडा एकावा लागला. मागील चार पाच दिवसांपासून बंद असलेल्या एका विशिष्ट मशीन वरून गेले तीन चार दिवस सकाळची प्रोडक्शन आणि लॉस मीटिंग म्हणजे मेंटेनन्स हेडला नकोशी झाली होती.

इथ थोडस सकाळच्या मीटिंग बद्दल. बहुतांश कंपनीमध्ये सकाळी प्रॉडक्शन मीटिंग घेण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा, गुणवत्ता, उत्पादन, ग्राहकाला पाठवला गेला माल इत्यादी कालच्या ठरवलेल्या आणि साध्य केलेल्या संख्या यावर चर्चा होते.
 ज्या ठिकाणी अपेक्षित ध्येय गाठले जात नाही तिथे काय लॉसेस होते याचा आढावा आणि कृती आराखडा बघितलं जातो. हे लॉस होऊ नये यासाठी वेगवेगळे विभाग जबाबदार असतात. उदाहरणार्थ कच्चामाल न मिळाल्यामुळे होणारा लॉस यासाठी परचेस विभाग कार्यवाही करत असतो. आणि वेळेत कच्च्या मालाची उपलब्धता ही देखील बघत असतो. 
आपल्या आजच्या कथेमध्ये मशीन ब्रेक डाऊन झाल्यामुळे होणारा लॉस या विषयावर आपल्या मेंटेनन्स हेडला ऐकून घ्यावे लागले होते
आता ही जी मशीन बंद पडली होती तिचे ह्याच कारणासाठी मागील सहा महिन्यात हे दुसरे ब्रेकडाऊन होते. ही ह्या प्रकारची एकच मशीन असल्याने उत्पादन थांबून त्याचा पूर्ण करण्यासाठीच वेळ वाढला होता.
त्या दृष्टिने पाहू जाता ही मशीन सुपर क्रिटिकल प्रकारची मशीन होती. म्हणजेच अशी मशीन की ज्यामुळे ग्राहकाला पाठवायचे उत्पादन थांबू शकते. शेवटी कंपनीचा सर्व उपद्व्याप हा ग्राहकाला वेळेवर माल पाठवणे आणि त्यातून नफा कमावणे हाच असतो असो.
तर पुनः ह्या प्रॉब्लेम कडे वळू. तर मेंटेनन्स हेड मीटिंग संपवून मेंटेनन्स शॉप मध्ये आले. तिथे फळ्यावर ब्रेकाडाऊन ची कारणमीमांसा मांडली होती
मशीन नाव - वेल्डिंग ०१२३
ब्रेकडाऊन सुरू झाल्याची वेळ आणि दिनांक ८.३०, शनिवार २२ मार्च २००८

मेंटेनन्स ऑपरेटर ची शेवटची ॲक्शन - वेल्डिंग टॉर्च बदलणे ( त्याच भागाची वाट पाहणे सुरू आहे)

का १ - टॉर्च जळाली
का २ - टॉर्च क्षमतेपेक्षा गरम झाली
का ३ - टॉर्च ला थंड ठेवण्यासाठी चा पाणी पुरवठा बंद आढळला.

मूळ कारण - वेल्डिंग टॉर्च थंड ठेवण्यासाठी होणारा पाण्याचा पुरवठा बंद होता. 

तर मग त्यादिवशी अस वेगळं काय झालं की पाणी बंद होते.
तर यामागे खोच अशी होती की त्यादिवशी आठवडी सुट्टीनंतरचा पाहिला दिवस होता. नेहमीचा कामगार सुट्टीवर असल्यामुळे नवीन कामगार त्या ठिकाणी काम करत होता. मशीनचा मागील बाजूस असलेला पाणी पुरवठा करणारा व्हॉल्व बंद होता. जो प्रत्येक वेळा मशिन सुरू करताना तपासणे आवश्यक असे. आणि ही गोष्ट नेहमीचे कामगार पाळत असतं.
इथपर्यंत पुन्हा एकदा वाचून झाल्यावर मेंटेनन्स हेड ने ट्रेनिंग विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि ह्याविषयावरील एक one point lesson (OPL- एका वाक्यातील धडा) बनवून त्या मशीन वरच लावायला सांगितला.
तसेच तिथे काम करणाऱ्या सर्व कामगारांना तो धडा शिकवला जाईल ही जाणीव करून दिली. त्यानुसार ट्रेनिंग अधिकाऱ्याने कार्यवाही केली.
दरम्यान बाहेर देशांमधून आणलेला सुटा भाग देखील मिळाला. तो बदलून मशीन सुरू झाली आणि उत्पादन विभागाला मशीन देण्यात आली.

ज्ञान आणि कौशल्य हे एकमेकांना सांगितले शिकवलेच पाहिजे हा या सर्व अडचणी मधून मिळालेला धडा होता. त्यातून शहाणे होत ट्रेनिंग विभागाने पुनः एकवार असे क्रिटिकल स्किल शोधून त्याचे OPL बनवून ट्रेनिंग घेतले.

संत रामदासांनी म्हटलेच आहे
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।

सचिन काळे ©️