Sunday, 8 June 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २५ ध्येय - २

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २५ ध्येय - २
... मे आय कम इन सर असं म्हणत तो दरवाजा उघडून पूर्ण आत आला...
अजून एक पाऊल पुढे टाकत त्याने दरवाजा सोडला. तो त्याच्यामागे अलगद बंद झाला. बंद होताना शेवटी लॅच चा कट असा बारीकसा आवाज आला. त्या भल्या मोठ्या ऑफिस मध्ये आत आल्याबरोबर लक्ष्य जात होत ते मोठ्या मेज कडे त्यासमोर असलेल्या कमवलेल्या उंची चामड्याच्या कुशन असलेल्या तीन खुर्च्या, त्यापलीकडे मोठ्या कुशन च्या आणि उंच पाठीच्या खुर्चीवर बसलेल्या बिझनेस हेडकडे. ते त्यांच्या समोरच्या लॅपटॉप मधे बारीक नजरेने काही बघत होते. सोनेरी कड्याचा चष्मा थोडा नाकावर समोर आलेला. उंच भालप्रदेश सरळ नाक त्याखाली करड्या रंगाकडे झुकलेल्या तलवार कट मिश्या आणि टोकदार हनुवटी. आता थोड्या विचारात असल्याप्रमाणे हनुवटी खाली विसावलेले तर्जनी आणि अंगठा. त्यांनी चष्म्यातून याच्याकडे नजर टाकली आणि बसायला खूण केली. ती दहा पाऊल चटकन टाकत हा खुर्चीजवळ गेला. खुर्ची मागे ओढून त्यात अदबीने बसला. नेहमीप्रमाणेच त्या उंची कुशन मध्ये चार इंच आत रुतला. 
अजूनही बिझनेस हेड चे लक्ष्य हे लॅपटॉप च्याच स्क्रीन कडे होते. ते बसले होते त्यांच्या मागच्या भीतीवर मोठा फोटो होता संस्थापकांचा. डाव्या बाजूच्या भीतीवर मोठा जगाचा नकाशा त्यावर देशभर पसरलेले एकवीस प्लांट आणि बाहेर देशातील चार प्लांट खुणेने दाखविलेले. यांचा सर्व कारभार इथून हाकला जायचा.
त्याच्याच खालच्या बाजूला उंची सागवान पासून बनवलेले फाईल रॅक. त्याला लागून कोट अडकवायचे हँगर त्याच्या बाजूला ठेवलेली जेम्स बाँड सारखी काळी छोटी सुटकेस. उजव्या भिंतीवर लावले वेगवेगळे देश, विदेशात मिळालेले अवॉर्ड, त्याचे फोटो. त्यापुढे असलेली उंच खिडकी त्यावर सोडलेले फिकट रंगांचे पडदे.
मेजावर लॅपटॉप व्यतिरिक्त पेन स्टॅन्ड त्यात असलेले सोनेरी रंगांचे उंची फाऊंटन पेन हे सर्वच त्या ऑफिस ला एक वेगळी उंची आणत होत. मेजाच्या उजव्या बाजूला वेगवेगळी पुस्तके त्यात अगदी आताचे सेपियन्स - ब्रिफ हिस्ट्री ऑफ मॅनकाईंड - युवाल हरारी, how to win friends लिहिणारे डेल कार्नेगी, स्ट्रॅटेजीस असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके शिस्तीत ठेवलेली होती. त्यात लावलेल्या छोट्या कागदी चिट वाचनाची शिस्त दाखवत होत. सरांची वाचायची आवड त्याला चांगलीच ठाऊक होती. बिझनेस, इतिहास, मानसशास्त्र या विषयात त्यांची आवड आणि गती चांगलीच होती. ऑफिस मधे तर भरपूर पुस्तक होतीच त्याशिवाय सरांच्या घरी देखील एक मोठ ग्रंथालय त्यांनी बनवलेले हेही त्याला माहीत होत. बरेचदा काही संदर्भ लागले तर अमुक रांगेत ठेवलेले ते पुस्तक आणि त्याचा पान क्रमांक देखील ते सांगु शकत.
अजून एक दोन मिनिट गेल्यावर त्यांनी त्यांची नजर लॅपटॉपच्या स्क्रीन वरून हटवून याच्याकडे रोखली. चष्मा काढून त्यांनी हातात घेतला आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे भेदक नजरेने पहात त्यांनी क्षणभर विचार केला. विजय तुला आपला नागपूरचा प्लांट माहीत आहे. त्यावर याने हलकेच मान होकारार्थी हलवली. तर तिथे प्लांट हेड ची जागा रिकामी झाली आहे. आणि मागच्या दोन तिमाहीपासून काही वेगवेगळे प्रकार घडत आहेत आणि त्याचा परिणाम रिझल्टवर होत आहे. असं म्हणत त्यांनी डाव्या बाजूच्या ड्रॉवर मधून एक अहवाल काढला.आणि त्याच्यासमोर ठेवला. त्यावर मोठ्या लाल अक्षरात गोपनीय असं लिहिलेले. दुसरे पान बघ असं म्हणत ते मागे टेकून बसले. दोन्ही हाताची बोटे जुळवून मंदिर मुद्रा करत मान मागे टाकत ते त्याच्याकडे बघू लागले. हलकेच पुढे सरकत याने ती काळ्या रंगांची सूचिका जवळ ओढली आणि उघडून तो दोन क्रमांकाचे पान बारकाईने बघू लागला. 
ते म्हणजे बॅलन्स शीट होती. बॅलन्स शीट हा आस्थापनाच्या प्रकृतीचा आरसा असतो. जसं ECG रिपोर्ट हृदयाची प्रकृती कशी आहे हे दाखवत तसं एक बॅलन्स शीट हेही आस्थापनाची प्रकृती कशी आहे हे दाखवत. फक्त ज्याप्रमाणे एक ECG रिपोर्ट बघून डॉक्टर निदान करतो त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बघून आस्थापनाच्या प्रकृतीचे निदान करण्यासाठीही एक तयार दृष्टी बघणाऱ्याकडे असावी लागते.
( Good Observation Good Analysis-S Yamaguchi San TPM GURU
विजयने तो कागद डावीकडून उजवीकडे असा वाचत संपवला.
बॅलन्स शीट परत एकदा सूचिकेत ठेऊन ते परत देताना त्याचा चेहरा निर्विकार होता.
ती सूचिका पुन्हा जागेवर ठेवत. बिझनेस हेड त्यांच्या खुर्चीमध्ये जरा अजून आरामात बसले. तर हे असं आहे. मला आणि व्यवस्थापनाला असं वाटतं की तू काही दिवसांसाठी तिथे जावस. विचार कर निर्णय घे आणि मला सांग जास्तीत जास्त दोन दिवसात. त्यानंतर खास त्याच्यासोबत बोलण्यासाठीच असलेल्या खाजगी आवाजात हळुवारपणे ते म्हणाले अर्थात तू नकार देऊ शकतोस सविताशी बोल आणि मग मला सांग. 
तितक्यात दार हलकेच वाजले उघडलेल्या दारातून ऑफिस बॉय कॉफी चा ट्रे घेऊन आला. ब्लॅक कॉफीचं आरोमा त्या ऑफिसमध्ये सर्वत्र पसरला. ऑफिस बॉय कॉफीचे कप त्या दोघांसमोर ठेवून आवाज न करता निघून गेला.
सरांनी कॉफीचा कप उचलल्यानंतर विजयने त्याचा कप उचलला. सावकाश दोघेही कॉफीचे घोट घेऊ लागले. कडूसर चव जिभेवरून घशामध्ये उतरली. मघाचा इतरत्र पसरलेला अरोमा आता अगदी श्वासातून फुफ्फुसां पर्यंत जाऊन पोहोचला. कॅफेन मुळे चांगलीच तरतरी आली. 
अलगद कॉफीचा कप बशी मध्ये ठेवून ती कप बशी उचलून एका बाजूला ठेवत विजय खुर्ची मागं सरकवत सावकाश उठला. डायरी त्याने परत हाता मध्ये घेतली. सर मी सांगतो लवकरच. असं म्हणत हलकेच तो केबिनच्या बाहेर पडला. बिझनेस हेड यांनी परत एकदा त्यांच्या लॅपटॉप मध्ये डोकं घातलं...