Sunday, 16 March 2025

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २४-ध्येय भाग१

मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी २४-  ध्येय भाग १

खरं सांगायचं तर त्याला हे प्लांट हेड पद नकोच होत. तो रमायचा शॉप फ्लोअर वर. नवीन पोरा सोराना अस काही पिडून घ्यायचा की पुढच्या वर्षभरातच ती पोरं टेक्निकल गोष्टीत बाप बनून जायची.
पण व्यवस्थापनाला त्याच्या मधील सुप्त गुणांची जाणीव होती. फक्त प्रोडक्शन हेड असला तरी त्याची तैल बुद्धी कठीणातील कठीण समस्या चुटकी सरशी सोडवायची त्यासोबतच त्याच्या कडे बॅलन्स शीट आणि व्यवसाय याविषयीचे फंडे क्लिअर होते. बरेचदा बिझनेस हेड हे याच्याशी अडचणीचे विषय बोलत आणि त्या चर्चे अंती त्यावर त्यांना चांगला मार्ग ही मिळे.
जेव्हा नागपूरच्या त्यांच्या एका प्लांट मध्ये अडचण निर्माण झाली आणि तिथला प्लॅन्ट हेड यांना काही वैयक्तिक कारणांनी कंपनी बाहेर जावं लागलं त्यावेळेस बिझनेस हेडना याचा चेहरा आठवला. खरं तर संभाजीनगर आणि नागपूर हे काही फार दूर नाही. आणि याने जेव्हा नागपूरचा प्रकल्प उभा राहत होता तेव्हा तिथे कामही केलेले. अशा सगळ्या जमेच्या बाजू त्यांच्या डोळ्यापुढे झर्रकन गेल्या.
सकाळी सकाळी हा आपला शॉप फ्लोअर वर राऊंड घेत असताना बिझनेस हेड त्याला शोधत शोधत तिथे आले.
त्याच्या सोबत शॉप फ्लोअर वर चालता चालता नेहमी प्रमाणे त्यांनी त्याच्या खाद्यावर हात ठेवला. एखादी गुप्त गोष्ट सांगावी त्याप्रमाणे खालच्या आवाजात त्याला सांगितलं की नागपूर प्लांट मध्ये एक जागा झाली आहे आणि तू तिथ जावं अस मला वाटत. अर्थात तू तयार असशील तर आपण पुढ बोलू. मला दुपारपर्यंत सांग अस म्हणत नेहमीप्रमाणे मिश्किल हसत बिझीनेस हेड लांब पावलं टाकत त्यांच्या वरच्या मजल्यावरील ऑफिस कडे निघून गेले. आणि हा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिला....
राऊंड संपवून तो जागेवर टेकला. आणि रोजचे रिपोर्ट असलेले ईमेल बघायला सुरुवात केली. तितक्यात मघाचे बिझीनेस हेड चे बोलणे आणि त्यातील नागपूर नाव आठवताच बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या आठवणी मधून वर येऊ लागल्या. 
नागपूर म्हणजे रसाळ आंबट गोड संत्री आणि गर्मी. तिखट जेवण आणि माणसं ही बोलायला तिखट, तेज पण मोकळी ढाकळी. अगदी बोलतानाही करून राहिलो जाऊन राहिलो असं डब्बल क्रियापद वापणारी. मुळातच सुपीक जमीन आणि भाषेमध्ये असलेले भरपूर शब्द आणि त्याचा सढळ वापर वैदर्भि पाहुणचाराप्रमाणेच करणार मोठ मन. एके काळी मध्य प्रांताची राजधानी असणार हे शहर संयुक्त महाराष्ट्रात मोठ्या मनाने उपराजधानी बनून सामील झालेले. हे असे आगा पिछा नसलेले विचार करता करता त्याचा मोबाईल वाजला.
विजय तू जरा माझ्या केबिन मधे येतोस थोड तातडीच आहे. बिझनेस हेड चा आवाज त्याच्या कानात गुंजला. नेहमीप्रमाणे एक शब्दही अधिक न बोलता आणि मोबाईलचे बिल न वाढवत समोरून फोन कट झाला.
संगणकाकडे आणि त्यावरील उत्पादन अहवाला कडे एक वार नजर टाकून याने खुर्ची मागे सरकवली, नेहमीप्रमाणे चाकांचा  चुई चुई आवाज झाला.  संगणक बंद करून त्याने त्याची डायरी उचलली खिशाला पारकर चे पेन आहे याची खात्रि केली. एकवार केसात हात घालून आधीचेच व्यवस्थित असलेले केस परत एकवार व्यवस्थित करून तो त्याच्या केबिन बाहेर पडला. 
तो बाहेर आला तसा त्याचीच वाट पाहत थांबलेले त्याचे सुपरवायझर त्याच्याकडे आले. त्यांना हातानेच थांबवत तो म्हणाला वर जाऊन येतो. काही तातडीच आहे का. त्यांच्या नकारार्थी हलेल्या माना बघत तो जिन्याकडे चालू लागला.
दोन जिने नेहमीप्रमाणे झपाझप चढून तो वरच्या मजल्यावर आला. एव्हढे वेगात जिने चढल्याने थोडीही धाप लागली नाही हे जाणवून परत एकदा स्वतःला शाबासकी देत आणि बायकोला धन्यवाद देत तो पुढे चालू लागला.
मागच्या सहा महिन्यांपासून त्याची बायको  त्याला रोज पाच किलोमीटर चालायला जावं म्हणून माग लागायची. अर्थात त्याच्या  मानसिक आणि शारीरिक फिटनेस यामागे तिचा मोठाच वाटा होता.
जसं  आपण वर जातो तस तस वातावरण विरळ व्हायला लागत आणि आवाज देखील कमी होत जातात.
खाली शॉप फ्लोअर वर मशीन चा आवाज, मटेरियल वाहून नेणाऱ्या ट्रॉलीच्या लोखंडी चाकांचा खडखडाट, धातूला आकार देताना घातल्या जाणाऱ्या घणाचा येणारा ठण ठण आवाज, कामगारांचे आवाज आणि मशिनरीच्या वरताण त्यांच्यावर ओरडून बोलणाऱ्या सुपरवायझरचे आवाज. पेंटशॉप मध्ये कन्वेअर वर पार्ट लावताना पडून होणारा आवाज.
पण या मजल्यावर मात्र त्यातील एकही आवाज यायचा नाही. कंपनीचे मुख्यालय असलेला हा मजला इथल्या विरळ हवेत आवाज असायचा तो सेंट्रल एसीचा आणि कॉफी मशीनच्या वाफेचा. तिथलं बोलणही अगदी मोजून मापून. सर्वत्र एक गंभीर वातावरण. महोगणी लाकडा पासून बनवलेल्या भिंती त्यावर एखादेच चित्र.  त्यावर सोडलेला पिवळा लाईट. नेहमीप्रमाणे तिथे तो थोड रेंगाळला आणि नेहमीप्रमाणेच त्याला त्यावरील सही वाचता आली नाही... 
त्या सर्व मजल्याला एक भव्य असं व्यक्तिमत्व होतं. एवढ्या मोठ्या जागेत तीनच ऑफिस एक संस्थापकांचे, दुसरे बिझनेस हेड यांचे आणि तिसरे कायम मोकळे. 
आणि त्यासोबतच एक नंदीचे डेस्क त्यावर एक मोठ्या स्क्रीनचा कम्प्युटर, त्यासोबतच प्रिंटर, आणि कागद बारीक तुकडे करणारी मशीन. दोन तीन कॅलेंडर त्यावर केलेल्या वेगवेगळ्या नोंदी. बाजूला तीन पेन बॉक्स त्यात वेगवेगळे पेन पेन्सिल हायलाईटर पेन स्टेपलर. बाजूच्या टेबलावर तीन ट्रे त्यात सर्वात वरच्या ट्रे मध्ये बिझनेस हेडच्या सही साठीचे कागद, दुसऱ्या मध्ये सही झालेले कागद तर सर्वात खालच्या ट्रे मधे अधिकची माहिती मागणारे अथवा प्रत्यक्ष भेटा असा निरोप असलेले कागद. त्याला बरेचदा लाल पिवळा अथवा हिरव्या रंगाच्या पोस्ट इट  कागद लावलेला असे त्यावर बिझनेस हेड च्या सुंदर हस्ताक्षरात फाऊंटन पेनने काही नोंदी देखील असत. 
नंदीचे टेबल नेहमीच स्वच्छ असे. एकही फाईल त्याच्याकडे वाट पाहते आहे असे कधीच झाले नाही. कायम गंभीर असणारे नंदी हे त्या ऑफिसला साजेसेच होते. मूळ संस्थापकांच्या हाताखाली ऑफिस बॉय असलेले नंदी तोंड बंद आणि कान उघडे ठेवत तयार झालेले. आणि ऑफिस बॉय ते आता एक्झिक्युटिव्ह असिस्टंट अशी प्रगती याच कमी बोलणे आणि जास्त काम करण्यामुळे झाली.
नंदी याचं मूळ नाव काही वेगळेच पण जस महादेवाकडे जाताना नंदी महाराजांचे दर्शन होत तसं बिझनेस हेड कडे जाताना त्यांच्या सहायकाचे दर्शन होत.
याला पाहताच नंदी म्हणाले आलास तू, सरळ आत जा तुझीच वाट पाहत आहेत. त्यावर होकारार्थी मान हलवत हा पुढे झाला. 
डायरी डाव्या काखेत पकडत आणि डावा हात पितळी नॉब वर ठेवत उजव्या हाताने त्याने दरवाजावर हलकेच टक टक केले. आतून अस्पष्ट असा कमिंग आवाज ऐकल्यावर डाव्या हातातील नॉब फिरवत त्याने दरवाजा उघडला आणि उजव पाऊल आत टाकलं. मे आय काम इन सर असं म्हणत तो दरवाजा उघडून पूर्ण आत आला...

Saturday, 8 March 2025

करिअरची गुणसूत्रे - डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर

करिअरची गुणसूत्रे - डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर

डॉ.भूषण आणि डॉ.मधुरा केळकर यांनी लिहिलेले करिअरची गुणसूत्रे हे पुस्तक विद्यार्थी नोकरदार आणि ज्यांना शिकण्याची मुख्यत्वे स्वतःला अद्यावत करण्याची इच्छा आहे त्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे. 
तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहेत. हा वेग अगदी भोवळ आणणारा आहे. काल जे ज्ञान आणि कौशल्य याद्वारे हमखास रोजगार मिळत होता त्यावर याचा परिणाम होत असून वेगळ्या प्रकारचे रोजगार आज निर्माण होत आहे यासाठी नवीन कौशल्य आणि ज्ञान गरजेचे असून ते आत्मसात करणे आणि स्वतःला नवीन स्पर्धेसाठी तयार ठेवणे यासाठी हे पुस्तक नक्कीच मदतीचे ठरेल. 
गेल्या काही वर्षांमध्ये मुलाखती घेत असताना उमेदवार हे अजूनही पारंपारिक पद्धतीनेच विचार करतात तसेच इंडस्ट्री 4.0, ए आय आणि आजकाल ज्याचा खूप बोलबाला झालेला आहे ते चॅट जीपीटी सारखे तंत्र याविषयी बहुतेक जण अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. 
आमच्या आस्थापनामध्ये याविषयी एक इनोव्हेशन सेल बनवण्यात आला असून त्याद्वारे व्यवस्थापक आणि विभाग यांची उत्पादकता कशी वाढवता येईल याविषयी अभ्यास सुरू आहे. या तिन्ही नवीन संज्ञांचा वापर उत्पादन तसेच रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्यासोबतच सप्लाय चेन मॅनेजमेंट या विभागांमध्ये करणे सुरू झाले आहे. 
या पुस्तकाचं त्यात सांगितलेला तंत्राचा उपयोग कसा होऊ शकतो याचे एक उदाहरण म्हणजे गेले काही वर्षांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी चांगली आस्थापनं मिळत नाहीत तर यावर यामध्ये एक धडा क्रमांक 15 असून इंटर्नशिप साठी वेगवेगळ्या वेबसाईट दिलेल्या असून घरबसल्या मोबाईल द्वारे इंटरशिप शोधता येईल त्यासोबतच ती वर्चुअली देखील करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 
त्यासोबतच करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे वेगवेगळे विषय उदाहरणांसह त्यासोबतच मुख्यत्वे ऑनलाइन आणि नाम मात्र शुल्क अथवा अगदी विना मोबदला कशा पद्धतीने करता येईल यासाठीच्या वेबसाईट वेगवेगळे ॲप्स यांची देखील माहिती देण्यात आलेली आहे विषयांचे नाव बघितले तर त्याचे महत्त्व समजून येईल उदाहरणार्थ टाईम मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, पेटंट, डिजिटल प्रेझेन्स, जॉब शोधताना इत्यादी इत्यादी. 
एकंदरच स्वतःला अद्यावत करण्यासाठी ह्या लेखक द्वयीने लिहिलेले करिअरची गुणसूत्रे हे पुस्तक खूप उपयोगी ठरणार आहे. मराठी भाषेमध्ये एवढे सुंदर पुस्तक आणल्याबद्दल दोघांचेही खूप खूप कौतुक आणि आभार.
 
सचिन काळे