माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे " you can change friends but not neighbours".
उत्पादन क्षेत्रामध्ये हेच वाक्य थोडंसं वेगळं करून म्हणता येईल " you can change organisations but not colleague / boss"
आयुष्याच्या टप्प्यावर बरेचदा आपली गाठ जूने मित्र, स्नेही, परिचित यांच्याशी वेगवेगळ्या वेळी पडते आणि मग आपण म्हणतो अरे दुनिया गोल आहे.
एक गावात एका वर्गात शिकणारे दोन विद्यार्थी त्यांच आपसात कधीच जमलं नाही परंतु अभियांत्रिकी करायला त्या दोघांचाही नंबर एकाच कॉलेजला आणि बाहेरगावी लागला. इतकी वर्ष एकमेकांशी न जमणारे हे दोघे त्या नवीन गावात नवीन कॉलेजमध्ये एकत्र रुजू झाले आणि कॉलेज संपेपर्यंत एकाच रूममध्ये राहिले. जुळवून घेता घेता ते दोघं खूप चांगले मित्र पण झाले. असे उदाहरण आपल्या आसपास भरपूर असतील.
मात्र उत्पादन क्षेत्रातील आज एक जी गोष्ट सांगणार आहे ती मानवी स्वभाव सांगणारी आहे.
तर झालं असं की एका मोठ्या वाहन उत्पादन कंपनीमध्ये एक जण त्यांना आपण प्रशांत म्हणूयात तर हे प्रशांत एका विभागामध्ये रुजू झाले. प्रशांत यांचा अनुभव बराच मोठा होता. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून आलेले तसेच वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्स भात्यात असलेले प्रशांत हे लवकरच सगळ्यांच्या गळ्यातले ताईत झाले. त्या विभागातील अनागोंदी आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी संपवली आणि तो विशिष्ट विभाग हा पूर्ण क्षमतेने काम करू लागला.
पुढे काही महिन्यानंतर त्याच विभागांमध्ये परंतु कॉर्पोरेट लेवलला अजून एक साहेब आले त्यांना आपण अजय म्हणू. तसं पाहिलं तर प्रशांत यांचं रिपोर्टिंग हे प्लांट मध्ये होतं आणि कॉर्पोरेटशी त्यांचा थेट संबंध नव्हता. तरी दखील अजय यांनी प्रशांत यांच्या विभागामध्ये दखल द्यायला सुरुवात केली. एवढेच नाही तर पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी प्रशांत यांच्या कामांमध्ये चुका काढायला सुरुवात केली तसेच त्यावरून त्यांना सगळ्यांसमोर आणि माघारी अद्वातद्वा बोलायला सुरुवात देखील केली. प्रशांत यांचे कामाचे तास वाढले तसेच त्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला जे हसू असायचे ते देखील गायब झालं.
या दोघांमध्ये काही ठीक नाहीये हे सगळ्यांना जाणवायला लागले. त्यातच त्या विभागामध्ये एक जुनी झालेली चूक अजय यांनी शोधली आणि त्या चुकीची जबाबदारी प्रशांत यांच्यावर टाकून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. तसं पाहिलं तर त्या गोष्टीचा आणि प्रशांत यांचा काहीही संबंध नव्हता तरी देखील त्यांना शेवटी राजीनामा द्यावा लागला.
प्रशांत कंपनी बाहेर पडल्यानंतर पुढे काही महिन्यांमध्येच अजय यांना पण आस्थापनाने जायला सांगितले त्याचे कारण असे होते की अजय यांनी कोड ऑफ कंडक्ट फॉलो केलेला नाही.
इथून बाहेर पडल्यानंतर प्रशांत यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांचे आता बरे चालले आहे.
पुढे काही काळ लोटल्यानंतर कळाले की सुरुवातीच्या काळामध्ये अजय आणि प्रशांत हे एकाच आस्थापनामध्ये होते त्या ठिकाणी अजय हे प्रशांत यांना रिपोर्ट करायचे. त्याही ठिकाणी अजय यांनी कोड ऑफ कंडक्ट फॉलो केला नाही म्हणून प्रशांत हे साहेब असताना त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली होती आणि त्यांना नोकरी सोडावी लागली होती. जरी ते दोघे त्या कंपनीतून बाजूला झाले तरी पुढे अनेक वर्षानंतर जो आधी साहेब होता तो ज्युनिअर झाला आणि जो ज्युनिअर होता तो साहेब झाला.
आपण कंपनी बदलू शकतो परंतु आपला जुनियर अथवा वरिष्ठ बदलू शकत नाही. शेवटी कुठे ना कुठे आपली भेट होत असते.
कारण दुनिया गोल आहे.
आता वरील कथेत कोण चूक अथवा कोण बरोबर हे महत्त्वाचे नाही तर
नवीन ठिकाणी गेल्यावर जुनी पाटी कोरी करायला पाहिजे.
जून पुराणे हिशेब तिथेच सोडून द्यायला हवे.
कुठल्याही आस्थापनाचे / विभागाचे यश हे टीमवर्क किती चांगले आहे यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
आणि शेवटी सर्वात महत्वाचे
कुठेही वागताना आपण संत रामदासांनी छ. संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे वागलो तर नुकसान मुळीच होणार नाही.
अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||
सचिन काळे ©️
लिंक मध्ये शिवराजास आठवावे हे संत रामदास यांनी लिहिलेले पत्र
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82